Nigdi News : ‘जीवन आनंद’ सकारात्मक दुष्टकोन वृद्धिंगत करणारा शब्दप्रवास – निशिगंधा वाड

एमपीसी न्यूज – ‘ज्येष्ठ नागरिकांनी लिहिलेल्या आनंदी आणि सकारात्मक अनुभवांचे ‘जीवन आनंद’ हे सकारात्मक दुष्टकोन वृद्धिंगत करणारा शब्दप्रवास आहे,’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले. मनोहर वाढोकर सभागृह, निगडी येथे शनिवारी (दि.30) आयोजित ‘जीवन आनंद’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निशिगंधा वाड बोलत होत्या.

यावेळी नगरसेवक अमित गावडे, शकुंतला गावडे, प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी, लेखन स्पर्धेतील विजेते, जेष्ठ नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोना काळात सगळीकडे असलेल्या नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक आणि आनंदी अनुभवाची लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याच लेखन स्पर्धेतील ज्येष्ठ नागरिकांनी लिहिलेल्या आनंदी आणि सकारात्मक अनुभवांचे ‘जीवन आनंद’ हे पुस्तक सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. तसेच, स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

निशिगंधा वाड म्हणाल्या, ‘सकारात्मक दुष्टकोन वृद्धिंगत करणारा ‘जीवन आनंद’ पुस्तक हा एक शब्दप्रवास आहे. या स्तुत्य उपक्रमाला माझा मानाचा मुजरा. प्रभागातील जेष्ठ नागरिकांसाठी अमित गावडे यांनी असा उपक्रम राबविला ही कौतुकास्पद बाब आहे. अशा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ माझ्या हस्ते होत आहे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अशा स्पर्धा नागरिकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करतात,’ असे निशिगंधा वाड म्हणाल्या

‘स्पर्धेचे स्वरूप बहिर्मुख नसते, ती स्वतःशीच असते. या लेखन स्पर्धेतून जेष्ठ नागरिकांना पुन्हा स्वतःशीच भेटण्याची संधी मिळाली असेल‌, असे सांगून निशिगंधा वाड यांनी अनेक दाखले देत समाज आणि विचारातील समानतेवर आपली मतं मांडली. तसेच, विविध विषयांवर अनुभव कथन केले.

दरम्यान, नगरसेवक अमित गावडे म्हणाले, ‘कोरोना काळात एक नकारात्मक आणि भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याकाळात सकारात्मक आणि आनंदी अनुभवाची लेखन स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतून सात विजेते निवडण्यात आले. पुस्तकामुळे नागरिकांमध्ये नक्कीच सकारात्मक उर्जा निर्माण होईल यात शंका नाही.’

प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कुलकर्णी यांनी मराठीतील दिग्गज लेखक, लेखिका, कवी यांच्या लिखाणाचा आढावा घेतला. तसेच, पुणेकरांच्या हटके जीवनशैलीवर आपल्या खुमासदार शैलीत टिप्पणी केली. कुलकर्णी यांनी कार्यक्रमात विविध कविता सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर, चंद्रशेखर जोशी यांनी आभार मानले.

सकारात्मक अनुभव लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे – 

महिला विभाग :

  • मंगला नारायण ताम्हनकर – (प्रथम क्रमांक)
  • अनघा अरुण कोत्तूर – (द्वितीय क्रमांक)
  • अनिता कोठडिया – (तृतीय क्रमांक)
  • सुचित्रा चंद्रमोहन साने – (उत्तेजनार्थ)
  • प्रज्ञा लिमये पिसोळकर – (उत्तेजनार्थ)
  • अरुणा देविदास डोके – (उल्लेखनीय लेख)
  • माधुरी गोवर्धन – (उल्लेखनीय लेख)

पुरुष विभाग :

  • बाबुलाल मोतीलालजी भंडारे – (प्रथम क्रमांक)
  • व्यंकटेश एकनाथ पांडे – (द्वितीय क्रमांक)
  • राम भिडे – (तृतीय क्रमांक)
  • विनायक काळोखे – (उत्तेजनार्थ)
  • सुभाष कुंजीर – (उत्तेजनार्थ)
  • उमेश दिघीकर – (उल्लेखनीय लेख)
  • जनार्दन सावंत – (उल्लेखनीय लेख)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.