Dehuroad Crime News : गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचा-याला जमिनीवर पाडून मारहाण

एमपीसी न्यूज – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचा-याला एकाने जमिनीवर पाडून लाथाबुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणा-या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री सव्वाआठ वाजता देहूरोड बाजार येथे घडली.

अरविंद लक्ष्मण ढिल्लोड (रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गाडेकर हे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाच येथे कार्यरत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ते साध्या वेशात देहूरोड बाजार येथे गस्त घालत होते.

बालाजी लंच होम येथे आले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून झटापट करत फिर्यादी यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.