Akurdi news: बैठका घेवू नका म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच राजकीय बैठका !

नियमाचे उल्लंघन, सुरक्षित अंतराचा फज्जा

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेतात. मास्क न परिधान करणाऱ्यांना झापतात. मीडियाचे बूम देखील सॅनिटाइझ करतात. राज्यातील जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्याच पक्षाला त्याचा विसर पडला आहे. राजकीय बैठका घेण्यास मनाई असताना नियमाचे उल्लंघन करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पिंपरी- चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आज बैठक झाली. या बैठकीत सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता.

बैठका घेवू नका म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच राजकीय बैठका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता अजितदादा काय भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या 80 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत आहे.

अनलॉक पाचमध्येही राजकीय बैठका घेण्यास परवानगी नाही. कोरोना कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेत आहेत. मास्क, हातमोजे सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीतही ते काळजी घेतात. अधिकाऱ्यांनाही सूचना देतात.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना मीडियाचे बूम देखील सॅनिटाइझ करतात. सुरक्षित अंतर न पाळल्यास वेळप्रसंगी झापतात. जवळ येत बोलू लागताच त्यांनी मनसेच्या नगरसेवकाला झापले होते. अजितदादा एवढे पाळत असताना त्यांच्या पक्षाला, नगरसेवकांना मात्र याचा विसर पडला आहे.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आकुर्डीत आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सुरक्षित अंतराचे कसलेही पालन झाले नाही. कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”परवानगी नाही असे कोण म्हटले आहे. 100 पेक्षा जास्त लोक असतील तर परवानगी नाही”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.