Akurdi : नो पार्किंगमध्ये लावल्या प्रकरणी ‘पोलीस आयुक्तां’च्या कारवर देखील होणार कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियम सर्वांसाठी समान आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या प्रत्येक वाहनावर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईच्या बडग्यातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची कार देखील सुटणार नाही. आकुर्डी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर पोलीस आयुक्तांच्या अनुपस्थितीत नो पार्किंगमध्ये त्यांची कार लावण्यात आली. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या आयुक्तांच्या कारवर देखील कारवाई होणार आहे.

आकुर्डी रेल्वे स्थानकासमोर केरला भवनकडे जाणा-या रस्त्यावर डिव्हायडरच्या बाजूला नो पार्किंग करण्यात आले आहे. या ठिकाणी कार किंवा अन्य वाहने लावल्यास वाहतूक विभागाकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाईची मोहीम शहरात सर्वत्र सुरु आहे. आज (बुधवारी) सकाळी सव्वानऊच्या सुमारास पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची कार संबंधित चालकांनी आयुक्तांच्या अनुपस्थितीत या रस्त्यावरील नो पार्किंगमध्ये लावली. याचे स्थानिक नागरिकांनी फोटो काढले. त्यानंतर शिस्तप्रिय पोलीस आयुक्तांच्या कारला नियमांचे बंधन नाही का ? अशी चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. याबाबत पोलीस आयुक्तांना विचारले असता, त्यांनी संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले की, “शहरातील नागरिक चुकीच्या गोष्टी दाखविण्यासाठी पुढे येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. अधिकारी असो किंवा अन्य कोणीही असो नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. माझ्या अनुपस्थितीत कार नो पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे. ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. मी त्यावर कारवाई करणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.