Alandi : जमिनीच्या वादात मदत केल्यावरून हॉटेल मालकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – भावकीमध्ये सुरू असलेल्या जमिनीच्या वादात मदत केल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून हॉटेल मालकाचे अपहरण केले. तसेच त्याला मारहाण करत लुटले. ही घटना बुधवारी (दि. 29) दुपारी सव्वा पाचच्या सुमारास आळंदी येथे घडली.

पुरुषोत्तम प्रतापराव शितोळे (वय 31, रा. लोहगाव) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील काळुराम लोखंडे, संतोष काळुराम लोखंडे, निखिल सुनील लोखंडे, ज्योत्स्ना (पूर्ण नाव माहीती नाही. सर्व रा. मरकळ ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम यांचे खेड तालुक्यातील सोळू येथे हॉटेल आहे. आरोपी बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास पुरुषोत्तम यांच्या हॉटेलवर कारमधून आले. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून घेऊन गेले. ‘तू आमच्या भावकीतील अविनाश ऊर्फ गणपत लोखंडे याला जमिनीच्या वादातून मदत करतो काय?’ असे म्हणत आरोपींनी पुरुषोत्तम यांना लोखंडी पाईपने मारहाण केली.

तसेच पुरुषोत्तम यांच्याकडील 35 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.