Alandi News : माऊलींचा चल पादुका सोहळा हरिनाम गजरात पंढरपूरला मार्गस्थ

एमपीसी न्यूज – माऊली मंदिर लगत असलेल्या दर्शनबारी सभागृहात तब्बल 17 दिवसांचा पाहुणचार झाल्यानंतर पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारी पालखी सोहळ्याने माऊलींच्या चल पादुका हरिनाम गजर करीत पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. आकर्षक लक्षवेधी विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजलेल्या शिवशाही बसने सकाळी पादुका मार्गस्थ झाल्या. पादुकांसोबत दिंडीवाल्यासह पुजारी, सेवक चोपदार, मानकरी आहेत. आळंदी मंदिरासह पालखी सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, माऊलींचे मानकरी योगीराज कुर्‍हाडे, योगेश आरु, सेवक बाळासाहेब रणदिवे चोपदार, राजाभाऊ चोपदार, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, आळंदीचे मंडलाधिकारी चेतन चासकर भाविक उपस्थित होते.

पादूका पंढरीला जाण्यास निघण्यापूर्वी मंदिरात पालखी सोहळ्याचे परंपरेप्रमाणे सकाळी अभिषेक, दुधारती, कीर्तन, परंपरेप्रमाणे आरती झाली. त्यानंतर कर्णेकरी यांनी परंपरेने कर्णा वाजवीत सोहळ्यास निघण्याची वेळ जवळ आल्याचे संकेत दिले. आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते माऊलींच्या पादुकांवर पुष्पहार अर्पण करीत सोहळा निर्विघन पणे पार पडावा यासाठी साकडे घालण्यात आले. 40 वारकरी भाविक, प्रांत विक्रांत चव्हाण आदींचा शाल श्रीफळ देऊन आळंदी नगरपरिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.