Pimpri News : आंबेडकरवादी पक्ष अल्पसंख्यांकासह महापालिका निवडणूक लढविणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक आंबेडकरवादी पक्ष अल्पसंख्यांकासह समन्वयाने लढविणार आहेत. त्याची तयारी सुरु झाली असून या संदर्भात नुकतीच एक संवाद बैठक पार पडली.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष रामदास ताटे, भारतीय रिपब्लिकन कामगार सेनेचे संतोष सकपाळ, बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम बाराधे, अल्पसंख्यांक आघाडीचे राजन नायर, सलीम शेख, बळीराम काकडे, भारत गणराज्य पाटीचे मुख्य संघटक अॅड. सतिश कांबिये बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये समन्वयाने आणि एकत्रितपणे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली. आंबेडकरवादी विचारसरणीच्या पक्षांना, अल्पसंख्यांक आघाड्यांना एकत्रित आणण्याचे नियोजन करण्याचे निश्चित झाले आहे. महापालिका निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे न होता बॅलेट पेपरवर व्हावी यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धत ही 74 वी घटना दुरुस्तीच्या तरतुदीच्या आधारे असंवैधानिक आहे. त्यामुळे अशी पद्धत चालू ठेवण्यात येऊ नये म्हणून जनसामान्यांमध्ये जागृती केली जाणार आहे. एक सदस्य प्रभाग पद्धत पुन्हा बहाल होण्यासाठी आंदोलन करण्यावर बैठकीत एकमत झाले आहे. या संवाद बैठकीचे आयोजन “एकात्मिक आंबेडकरवादी चळवळी”च्या कार्यकत्यांनी केले होते, याबाबतची माहिती संतोष सपकाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.