Bhosari News: आंद्रा, भामा आसखेड धरणातून डिसेंबरअखेर शहरवासीयांना पाणी मिळणार – महेश लांडगे

आमदार लांडगे यांनी केली तळवडेतील जलवाहिनीच्या कामाची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे. महापालिकेने तळवडे येथील 100 एमएलडी जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असल्याची माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. हे काम डिसेंबर अखेर पूर्ण होऊन शहरवासीयांना पाणी मिळेल असेही त्यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी) स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली. पिंपरी-चिंचवड शहराची 2031 पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहीत धरुन राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून अनुक्रमे 36.870 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन आणि 60. 791 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन असा एकूण 97.66 दशलक्ष घनमीटर प्रतिदिन पाणी कोटा आरक्षीत केला आहे.

दरम्यान, पुन:र्स्थापना खर्चाबाबत शासन स्तरावर निर्णय न झाल्यामुळे करारनामा करण्यात तांत्रित अडचण निर्माण झाली. परिणामी शासनाकडून पाणीकोटा रद्द करण्यात आला होता. यावर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पाणी आरक्षणासाठी फेर प्रस्ताव सादर केला. त्याला मान्यता मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने या कामाला गती दिली आहे.

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने विकसित होणाऱ्या चिखली, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशीसह शहराच्या परिसरात आरक्षित पाण्यावर प्रक्रिया करुन पाणीपुरवठा केला जाणार आहे.

डिसेंबर अखेर शहरवासीयांना पाणी- आमदार लांडगे

आंद्रा, भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर पिंपरी-चिंचवड शहरावरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होणार आहे. जॅकवेल संदर्भात भूसंपादनात काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, त्यावर तोडगा निघाला आहे. सप्टेंबर 2021 पर्यंत ‘रॉ वॉटर’ उपलब्ध होईल. त्यावर प्रक्रिया करुन शहरवासीयांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा डिसेंबरअखेर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.