Baramati: तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी ‘बारामती पॅटर्न’ चा पुन्हा अवलंब करा : जिल्हाधिकारी

Baramati: Re-adopt 'Baramati pattern' to liberate taluka corona: Collector S

एमपीसी न्यूज – बारामती शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागली आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी बारामती तालुका प्रशासनाने पुन्हा एकदा बारामती पॅटर्नचा अवलंब करावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
बारामती येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विश्रामगृह येथे बारामती तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‌व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने अधिक दक्ष राहून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला तालुका कोरोना विषाणूपासून लवकरच मुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला.
बारामती तालुक्यात कोविड केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण सुविधा वाढविण्यासोबतच कोरोनाबधित रुग्णांच्या अधिकाधिक संपर्क शोधण्यावर व तपासण्या करण्यावर अधिक भर द्या, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
बारामती शहरासोबतच ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करावी तसेच  संस्थात्मक विलगीकरण, कोरोना चाचणी व कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्क शोध मोहिमेसाठी  स्वतंत्रपणे समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात सहकार्य मिळावे. नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी राम यांनी बारामती शहरातील दोन प्रतिबंधित क्षेत्रास भेटी दिल्या. या भेटी दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व इतर वैद्यकीय सुविधा रोजच्या रोज पुरविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्याच बरोबर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या इतर काही अडचणी असल्यास त्या प्रशासनाने तत्काळ दूर कराव्यात. एका कोरोना बाधित रूग्णाच्या मागे कमीत कमी वीस व्यक्तींच्या तपासण्या करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.