Bharat Band Pune Update : पुणे शहर-उपनगरांमध्ये भारत बंदला संमिश्र प्रतिसाद !

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारच्या तीन कृषी सुधारणा विधेयकांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पुणे शहर आणि उपनगरांमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी काही दुकाने बंद तर अत्यावश्यक सेवेतील काही दुकाने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने आज (मंगळवार दि.8) भारत बंद पुकारण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही तोडगा निघालेला नाही. या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष, कामगार व शेतकरी संघटनांनी समर्थन दिले आहे.

बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतरही पुण्यातील व्यापारी संघटनांनी त्यांची आधीची भूमिका बदलत शेतकऱ्यांच्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातील लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता तसेच अन्य बाजारपेठा या दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

आधी व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला. मात्र, बंदमध्ये सहभागी होणार नाही असं म्हटलं होतं. परंतु बंदला समर्थन देण्यासाठी पुण्यात काढण्यात येणारा महामोर्चा मुख्य बाजारपेठेतून जाणार होता त्यामुळे किमान दुपारपर्यंत या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला.

दुपारी हॉटेल, मेडिकल स्टोअर्स आणि अन्य किराणा मालाची दुकाने सुरू होती. परंतु ग्राहकांची संख्या कमी होती. एकूणच शहर आणि उपनगरांमध्ये पीएमपीएमएल बससेवा, ओला-उबेर यांच्या चारचाकी वाहने व रिक्षा सेवा सुरू होत्या. परिणामी जनजीवन सुरळीत सुरू होते. मध्यवर्ती पेठांसह अन्य रस्त्यांवर गाड्या कमी संख्येने धावत असल्याचे चित्र होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.