Bhosari Crime News : दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दोन सराईतांना भोसरीत अटक

30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पाच कार, चार दुचाकी, 17 तोळे सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड असा 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – हडपसर येथून भोसरी परिसरात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीचा पाठलाग करून त्यातील दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चार कार, चार दुचाकी, 17 तोळे सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड आणि घरफोडीचे साहित्य, असे एकूण 30 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 32), जितसिंग राजपालसिंग टाक (वय 26, रा. बिराजदारनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना गस्त घालत असताना माहिती मिळाली की, इंद्रायणीनगर, भोसरी परिसरात हडपसर येथील सराईत गुन्हेगारांची एक टोळी कारमधून येणार आहे. त्यानुसार, दरोडा विरोधी पथकाने तीन टीम तयार करून सापळा लावला.

एक संशयित अल्टो कार दिसताच पोलिसांनी कारवाईसाठी हालचाल सुरु केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. दरम्यान तिघेजण कारमधून अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडूपातून पळून गेले. तर दोघेजण पोलिसांच्या हाती लागले.

दोघांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारमध्ये दोन बोअर कटर, दोन लोखंडी स्क्रू ड्रायव्हर, दोन लोखंडी कोयते, दोन लोखंडी कटावणी, एक सुटी दोरी, एक कार असा मुद्देमाल जप्त केला. इंद्रायणीनगर, भोसरी मधील वैष्णोमाता कॉलनी येथे दरोडा टाकण्यासाठी हडपसर येथून आल्याची आरोपींनी कबुली दिली.

आरोपींनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण परिसरातून बंद घरांचे, दुकानांचे कुलूप कटावणीने तोडून घोरफोडी तसेच वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक तवेरा कार, दोन मारुती अल्टो कार, एक स्विफ्ट डिझायर कार, एक मारुती झेन कार, एक होंडा स्प्लेंडर, एक बजाज पल्सर, एक बजाज डिस्कव्हर, एक होंडा ऍक्टिव्हा मोपेड अशी एकूण नऊ वाहने हस्तगत केली आहेत.

तसेच 170 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण 30 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील घरफोडी आणि वाहन चोरीचे 17 गुन्हे, पुणे शहरातील वाहनचोरीचे दोन, पुणे ग्रामीण मधील वाहन चोरीचे दोन असे एकूण 21 गुन्हे उकडीस आले आहेत.

आरोपी सुरजितसिंग टाक याच्या विरोधात पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे विविध पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी आणि वाहनचोरीचे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. तसेच जितसिंग टाक याच्या विरोधात दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी आणि वाहनचोरीचे तब्बल 23 गुन्हे दाखल आहेत. अन्य एक आरोपी सनी सिंग दुधानी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे आणखी दोन साथीदार अद्याप फरार आहेत. हे सर्व आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत.

अशी करायचे वाहन चोरी

एखादे चारचाकी वाहन चोरायचे ते सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी अथवा झाडाझुडुपांमध्ये पार्क करायचे. काही दिवसानंतर एखादी दुचाकी चोरायची आणि पार्क केलेल्या वाहनापर्यंत जायचे. तिथे दुचाकी लावून चोरीचे चारचाकी वाहन घेऊन एखाद्या ठिकाणी दरोडा अथवा घरफोडी करायची. आरोपी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून टोळीने चोऱ्या करायचे.

घरफोडीच्या गुन्ह्याला न्यायालय गंभीर गुन्हा मानत नाही. त्यामुळे या आरोपींना लगेच जामीन मंजूर होतो. जामिनावर बाहेर आल्यानंतर हे आरोपी पुन्हा चोऱ्या करतात. ज्या ज्या पोलीस ठाण्यात या आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत, त्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करावी. याबाबत सर्व पोलिसांना सूचना देणार असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

दरोडा विरोधी पथकाला पोलीस आयुक्तांकडून 50 हजारांचे बक्षीस

गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पथकाला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय तृंगार, उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, प्रवीण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे, संतोष सपकाळ, औदुंबर रोंगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.