Swarsagar Festival : येत्या शनिवार, रविवारी आर्य संगीत प्रसारक मंडळीच्या साथीने रंगणार स्वरसागर महोत्सव

भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दी निमित्ताने विशेष स्वर मानवंदना

पिंपरी – मागील सुमारे दहा महिन्यांपासून आपण सर्वच जण करोनाच्या साथीशी झुंजत आहोत. आता लस आली आहे. त्यामुळे परिस्थिती थोडीशी बदलली आहे, पण अजूनही पूर्णपणे पहिल्यासारखी नाही. या कसोटीच्या काळात सर्वच व्यवहारांवर बंधने आली होती. पण आता ती बंधने थोडी शिथिल होत आहेत. अशावेळी बंद असलेले सांस्कृतिक कार्यक्रम आता हळूहळू सुरु होत आहेत. याचेच औचित्य साधून पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित स्वरसागर महोत्सव येत्या शनिवारपासून रंगणार आहे.

यंदाच्या या 22 व्या स्वरसागर महोत्सवात आवडत्या कलाकारांचे गायन, वादन आपण पुन्हा एकदा मनात, कानात साठवून ठेवू शकणार आहोत. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे या वेळचा स्वरसागर महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळीच्या साथीने रंगणार आहे. यात स्वरभास्करांना सांगितिक मानवंदना देण्यात येणार आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या महोत्सवात त्यांना विशेष स्वरमानवंदना देण्यात येणार आहे.

या वेळच्या 22 व्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी म्हणजे 6 फेब्रुवारी आणि रविवारी 7 फेब्रुवारीला पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी, 6 फेब्रुवारी रोजी नृत्यकला मंदिरचे कलाकार नमो नटराजा या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात करतील.

त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचे नातू विराज जोशी यांचे गायन होईल. पुढील सत्रात ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल.

महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी हे संतूरवादन सादर करतील. त्यानंतर सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन होईल. पुढील सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व म्हणजेच आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन होईल. आणि महोत्सवाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझखान यांच्या सतार वादनाने होईल.

या सर्व कलाकारांना संवादिनीसाथ राजीव परांजपे, गंगाधर शिंदे, अभिनव रवांदे आणि प्रभाकर पांडव करतील. तसेच तबलासाथ पंडित मुकेश जाधव, रवींद्र यावगल, पांडुरंग पवार, रोहित मुजुमदार, शंतनू देशमुख आणि नंदकिशोर ढोरे करणार आहेत.

पिंपरी चिंचवडमधील संगीत रसिकांच्या मर्मबंधातील ठेव असलेल्या स्वरसागर महोत्सवाचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. ज्या आतुरतेने पुणेकर रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहात असतात त्याच आतुरतेने पिंपरी चिंचवडचे रसिक स्वरसागर महोत्सवाची वाट पाहात असतात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर सवाई गंधर्व संगीत महोत्सव होऊ शकला नाही.

मात्र यंदा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी आहे. या शुभयोगाचे औचित्य साधून स्वरसागर महोत्सव, आर्य संगीत प्रसारक मंडळ(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव) यांच्या सांस्कृतिक समन्वयाने पिंपरी चिंचवड येथे रंगणार आहे. तसे बघितले तर पिंपरी चिंचवड हे पुण्याचे जुळे शहरच आहे. आणि या निमित्ताने शहराच्या शिरपेचात एक वेगळाच तुरा खोचला गेला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

या स्वरसागर महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गालिंदे असून सहसमन्वयक प्रशांत पाटील आणि संजय कांबळे आहेत. शरयूनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत तुपे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून काही जागा राखीव आहेत.

मागील 21 वर्षांपासून शहरात सुरु असलेला स्वरसागर महोत्सव ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. येथे अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा देखील अनेक नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. त्यामुळे स्वरसागर महोत्सवाला येऊन कलाकारांना भरभरुन दाद द्या असे आवाहन यानिमित्ताने महोत्सवाचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.