Pune News : हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीवर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली मागणी

एमपीसी न्यूज – शरजील उस्मानी याने पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याच्यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

याबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे कि, ’30 जानेवारीला पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी आक्षेपार्ह विधाने केली आहेत.

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे.’

हे पत्र मिळताच शरजीलवर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून त्याला अद्दल घडवून अशा वक्तव्यांचे काय परिणाम होतात ते दाखवून द्या.

खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्या कालखंडात काय झाले याची जाणीव असताना अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही नसल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय.

या प्रकरणात कठोरातील कठोर आणि तत्काळ कारवाईच्या अपेक्षेत!’ असे फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.