Chinchwad Crime News : सेवा विकास बँकेत गोपनीय माहितीची चोरी; बँकेच्या माजी चेअरमनसह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आणि माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या सांगण्यावरून दोघांनी मिळून बँकेच्या कार्यालयातून रिकव्हरी विभागातील संगणकातून बँकेचा डाटा परवानगी शिवाय पेन ड्राइव्हमध्ये कॉपी करून घेतला. तसेच दोघेजण बँकेतून कागदपत्रे घेऊन जाताना आढळल्याची फिर्याद चिंचवड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

याबाबत रिकव्हरी ऑफिसरने फिर्याद दिली असून बँकेचे माजी चेअरमन, माजी अतिरिक्त सीईओ आणि अन्य दोघांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मी महेश मंगतानी (वय 52, रा. पिंपळे सौदागर) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मुलचंदानी (वय 63, रा. पिंपरी), माजी अतिरिक्त सीईओ निखिल शर्मा (वय 35, रा. पिंपळे सौदागर), हितेश ढगे (वय 32, रा. काळेवाडी) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सोमवारी (दि. 1) सकाळी पावणे बारा वाजता दि सेवा विकास को ऑप बँक ली. चापेकर चौक, चिंचवड येथे घडली. बँकेचे माजी चेअरमन मुलचंदानी आणि माजी अतिरिक्त सीईओ शर्मा यांच्या सांगण्यावरून आरोपी हितेश ढगे आणि त्याचा साथीदार बॅंकेच्या रिकव्हरी विभागात खाजगी साहित्य घेऊन जाण्यासाठी आले. रिकव्हरी विभागातील संगणकातून बँकेचा डाटा स्वतःच्या पेन ड्राइव्हमध्ये विनापरवानगीने कॉपी करून घेतला.

रिकव्हरी विभागातील फाईल मध्ये बँकेची कागदपत्रे घेऊन जात असताना बँकेच्या स्टाफने त्यांना हटकले असता आरोपी हितेश आणि त्याच्या साथीदाराने पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी आणि सेवा विकास बँकेचे नाव असलेला नकाशा फाडून पुरावा नष्ट केला.

तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सुरु असलेली गॅलॅक्सी कन्स्ट्रक्शनची फाईल त्यांनी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.