Bhosari : शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी सद्‌भावना यात्रा, कॅन्डलमार्च मदतनिधी

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीर येथे भ्याड दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवांनाच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी चिखलीतील सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेने सद्‌भावना पदयात्रा काढून मदतनिधी जमा केला. जमा झालेला 51 हजार रुपयांचा निधीचा धनादेश आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत माजी सैनिक संघटनेचे भोसरीचे अध्यक्ष नवनाथ मु-हे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला. शहीद जवान संजय राजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात येणार आहे.

चिखलीतील सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटना यांच्यावतीने या उपक्रमाला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. चिखली म्हेत्रेवस्ती येथील महादेव मंदिर परिसरातील विरंगुळा केंद्रापासून यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. त्यासाठी पदयात्रा रथ सुशोभित करण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रध्वज, भगवा ध्वज डौलाने फडकत होता. रथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दानपेटी, लाऊड स्पिकर, सद्‌भावना फलक लावून रथ सुशोभित करण्यात आला होता.

माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या हस्ते दानपेटी व रथाचे पूजन करुन दानपेटीत भरघोस मदतनिधी देत दानपेटीचे पूजन केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष लालासाहेब मोरे, उपाध्यक्ष हरीचंद्र जाधव, सचिव सुरेश काठोळे, सहखजिनदार ओंकार राजगुरे, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सहसचिव प्रभाकार धनोकार, विभागीय सचिव गजानन ढमाले, सदस्य रमेश काठोळे, रामदास मोरे, प्रल्हाद पाटील, नारायण माने, अनंतराव गुंजाळ, अलका मोरे, मीना मोरे, रुख्मिणी गोसावी, ज्ञानेश्वर साळुंके, संभाजी यादव, जगदीश प्रसाद, विलासराव मराठे, विदर्भ एकता मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते दादासाहेब ठाकरे उपस्थित होते.

सद्‌भावना पदयात्रा नियोजित मार्गावरुन मार्गक्रमण करीत असताना विविध हाऊसिंग सोसायटीमधील महिला, पुरुष व बालके दुकानदार, व्यापारी, पादचारी यांनी दानपेटीत व मदतनिधी टाकण्यासाठी उत्स्फुर्त सहकार्य केले. प्रत्येक चौका-चौकात थांबून नागरिक व व्यापारी, पादचा-यांनी दानपेटीत मदतनिधी दिला. देशभक्तीपर गीते, ‘शहीद जवान अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जय जवान, जय किसान’ या घोषणांनी पदयात्रेत सहभागींना वीरश्री संचारली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.