Pune : विद्यापीठ तक्रार निवारण – परिनियमाचे अभाविपद्वारे स्वागत

एमपीसी न्यूज- उच्च व तंत्रशिक्षण स्तरावरील विद्यार्थी तक्रार निवारण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या ‘विद्यापीठ तक्रार निवारण परिनियमाचे’ महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी आज अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अभाविपचे प्रदेश कार्यालय मंत्री नागसेन पुंडगे यांनी म्हटले आहेकी, विद्यार्थ्यांना प्रवेशापासून ते निकाल लागेपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. अशा वेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडे खुलेपणाने दाद मागणे शक्य होत नाही किंवा दाद मागितल्यानंतरही विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाकडून अपेक्षित आणि कालबद्ध प्रतिसाद दिला जात नाही.

यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर होतोच शिवाय अनेक वेळा अंतर्गत गुणदानाच्या अधिकारांचा गैरवापर करत विद्यार्थ्यांचे वर्ष मागे ठेवण्याचे गैरप्रकार देखील दिसून येतात. अशा घटनांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यापीठ तक्रार निवारण परिनियमांतर्गत थेट विद्यापीठ तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवता येणार आहे.

सरकारने आणलेल्या तक्रार निवारण कायद्याचे स्वागत करताना अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या तक्रारींना सुयोग्य आणि कालबद्ध पद्धतीने निवारण करण्यासाठी विद्यापीठ तक्रार निवारण समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या विद्यापीठ तक्रार निवारण – परिनियमाच्या तरतुदी मध्ये नमुद महाविद्यालयांचे माहितीपत्रक (प्रॉस्पेक्ट्स) हे विद्यार्थ्यांना सशुल्क ऐवजी मोफत उपलब्ध केले जावेत, तसेच तक्रारदार हा विद्यार्थी असल्याने खोट्या अथवा क्षुल्लक तक्रारींवर कारवाई करताना त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या स्वरुपाची असावी असे अभाविपचे मत आहे.” तसेच या परिनियमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून तात्काळ करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.