Bhosari : सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या साहाय्याने भोसरी पोलिसांनी लावला हरवलेल्या दोन चिमुरड्यांचा शोध

एमपीसी न्यूज – सोशल मीडियाच्या मायाजालात सर्व स्तरातील नागरिक अडकत आहेत. अनेक चुकीचे ट्रेंड सोशल मीडियाद्वारे समाजात पसरत आहेत. पण याच सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. याचा प्रत्यय बुधवारी भोसरी पोलीस ठाण्यात आला. दहा वर्षांची हरवलेली चिमुरडी सोशल मीडियाच्या माध्यमातून भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासात शोधून काढली. तर सीसीटीव्ही कॅमे-याच्या माध्यमातून एका साडेचार वर्षाच्या चिमुरडीला शोधण्यात देखील भोसरी पोलिसांना यश आले आहे.

बुधवारी (दि. 5) दुपारी कार्तिकी खोडके नावाची दहा वर्षांची मुलगी घराजवळच्या मंदिरात जाऊन येते म्हणून घराबाहेर पडली. मंदिर घराजवळ असल्याने घरच्यांनी तिला एकटीला जाण्यासाठी परवानगी दिली. मुलगी मंदिराजवळ गेली आणि चालता चालता रस्ता भरकटली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही. म्हणून घरच्यांनी तिचा परिसरात शोध घेतला. मुलगी घराबाहेर एकटीच गेल्याने आणि ती परिसरात सापडत नसल्याने कार्तिकीच्या घरचे पुरते घाबरले. त्यांनी तात्काळ भोसरी पोलिसात धाव घेतली आणि कार्तिकीच्या हरवल्याची माहिती दिली.

भोसरी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण 17 जणांचे पथक तयार केले. परिसरात शोधाशोध सुरु केली. दरम्यान, पोलिसांनी कार्तिकीचा फोटो आणि संपर्क क्रमांक व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केला. कार्तिकीला शोधण्याचे आवाहन केले. दिवस सरला. रात्र सुरु झाली. तरीही कार्तिकीचा काहीच पत्ता लागत नव्हता. रात्री साडेनऊच्या सुमारास दिघी रोडवरून एका गृहस्थाने कार्तिकीच्या वडिलांना फोन केला. पोलिसांनी दिलेल्या वर्णनाची मुलगी दिघी रोडवर असलेल्या मंगलमूर्ती कार्यालयाच्या दारात बसली असल्याची माहिती दिली. पालकांसह पोलिसांनी दिघी रोडवर धाव घेत कार्तिकीला ताब्यात घेतले आणि तिला तिच्या पालकांकडे सुखरूपपणे सुपूर्द केले.

14 डिसेंबर 2018 रोजी देखील भोसरी पोलिसांनी अशाच एका भरकटलेल्या साडेचार वर्षाच्या चिमुकलीला शोधून काढले होते. आलीय खान नावाची साडेचार वर्षांची चिमुरडी घरी मोबाईल फोनवर खेळत बसली होती. बराच वेळ मोबाईलवर खेळत असल्याने तिच्या आईने मोबाईल फोन काढून घेतला. त्यामुळे आलीय घराबाहेर खेळण्यासाठी आली. खेळता-खेळता ती रस्त्यावर आली आणि रस्त्यावरून चालू लागली. काही अंतर चालल्यानंतर घराकडे परतण्याचा रस्ता ती विसरली. बराच वेळ वाट पाहून घाबरलेल्या पालकांनी भोसरी पोलिसात धाव घेतली.

भोसरी पोलिसांनी गुन्हे शाखेला घटनेची माहिती दिली. भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण ४० जणांचे पथक तयार केले आणि आलियाचा शोध सुरु केला. परिसरातील सीसी टीव्ही तपासात असताना एका सीसीटीव्ही मध्ये आलिया एकटीच चालत गेल्याचे दिसले. त्यांनी त्यावरून शोध घेत तिला भगवती वस्ती जवळील एमआयडीसी परिसरातून शोधून पालकांच्या स्वाधीन केले.

सीसीटीव्ही, सोशल मीडिया आणि अन्य तांत्रिक बाबी पोलिसांना समाजाच्या सुरक्षेसाठी मदत करणा-या ठरत आहेत. नागरिकांनी देखील त्याचा योग्य वापर केल्यास सोशल मीडिया एक प्रकारे वरदान ठरणार आहे. अनेक फेक मेसेज वा-यासारखे सोशल मीडियावरून पसरत असतात. यातून अनेक वाद निर्माण होतात. त्यामुळे सोशल मीडियाच्या सकारात्मक वापराची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.