Bhosari : जुने फोटो व्हायरल करून लांडे समर्थकांकडून केला जातोय अपप्रचार – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि पदाधिका-यांसोबत काढलेले जुने फोटो व्हायरल करून भोसरी विधानसभेचे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून अपप्रचार केला जात आहे. फोटो व्हायरल करून मतदारसंघात संभ्रम पसरविण्याचे काम विलास लांडे यांच्याकडून केले जात आहे, असे शिवसेनेच्या शिरूर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी सांगितले.

‘आमदार विलास लांडगे पाटील भोसरी विधानसभा’ आणि ‘Vilas Sheth Lande Fc’ या दोन फेसबुक अकाउंटवरून फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे आदी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे पंडित गवळी तसेच अपक्ष उमेदवार विलास लांडे आदी दिसत आहेत.

यावेळी सुलभा उबाळे म्हणाल्या, “मागील आठ ते दहा महिन्यांपूर्वी दिघी येथे एका पदाधिका-यांच्या घरी दुःखद घटना घडली. त्यावेळी शिवसेनेचे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलो होतो. आम्ही पोहोचण्यापूर्वी विलास लांडे आणि त्यांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. सर्वजण एका खोलीत बसून बोलत असताना एका कार्यकर्त्याने फोटो काढले. तेच जुने फोटो आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल केले जात आहेत. महायुतीचे वातावरण विस्कळीत करून शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचेही उबाळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.