Chinchwad: चिंचवडमध्ये 491 मतदान केंद्र; पाच लाख मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – राज्यातील सर्वांत दुस-या क्रमाकांचा मोठा मतदारसंघ चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पाच लाख 18 हजार 309 मतदार असून सोमवारी 491 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 12 मतदान केंद्र संवेदनशिल असून 53 मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. चिंचवडमधून 11 जण निवडणूक रिंगणात आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात दोन लाख 76 हजार 927 पुरुष आणि दोन लाख 41 हजार 980 महिला आणि इतर 32 असे एकूण पाच लाख 18 हजार 309 मतदार आहेत. त्यामध्ये 495 दिव्यांग मतदारांचा समावेश असून 171 सैनिक मतदारांनाही मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 33 मतदान केंद्राचे स्थलांतरण करण्यात आले आहे. मतदानाकरिता 491 कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट तयार करण्यात आली आहेत. 98 कंट्रोल युनीट, बॅलेट युनिट आणि 50 व्हीव्हीपॅट राखीव म्हणून तयार करण्यात आली आहेत.

पिंपळेनिलख येथील मतदान केंद्र क्रमांक 358 या सखी मतदान केंद्रावर निवडणूक कामकाजाकरिता सर्व महिला कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. महात्मा फुले इंग्लिश मिडीयम स्कूल केंद्र क्रमांक 37 आणि जी.के. गुरुकुल केंद्र क्रमांक 278, विझडम वर्ल्ड स्कूल केंद्र क्रमांक 338 या मतदान केंद्राची आदर्श मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.

थेरगाव, नवी सांगवी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, वाकड येथील 12 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. संवेदनशील मतदार केंद्रासह 53 मतदान केंद्रामध्ये वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, विद्युत पुरवठा, ब्रेल भाषेतील मतपत्रिका आदी सुविधा मतदारांच्या सोईसाठी पुरविण्यात आल्या आहेत. वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांकरिता रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

‘हे’ आहेत 11 उमेदवार रिंगणात

भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप ‘कमळ’, अपक्ष निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे ‘बॅट’, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे ‘हत्ती’, बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप ‘खाट’, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले ‘हातगाडी’, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे ‘ऑटो रिक्षा’, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती ‘शिट्टी’, अपक्ष डॉ. मिलिंदराजे भोसले ‘हेलिकॉप्टर’, रवींद्र पारधे ‘कपबशी’, राजेंद्र काटे यांना नारळाची बाग आणि सुरज खंडारे यांना ‘संगणक’ हे 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.