NCP : आमदार अण्णा बनसोडे दादांची साथ सोडून भाईंचा हात धरणार?

एमपीसी न्यूज – एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड ( NCP) शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांचे नेमके चाललंय काय, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. कारण, दौऱ्यात नियोजन नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यामुळे बनसोडे हे खरंच अजितदादांची साथ सोडून एकनाथभाईंचा हात धरणार का, शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार का, याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असताना बनसोडे यांच्या कार्यालयात गेले. मुख्यमंत्री शिंदे यांनी बनसोडे यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. यापूर्वी देखील आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मोटारीत एकत्रित प्रवास केला होता. मुंबईपासून ठाण्यापर्यंत बनसोडे हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी शहर दौऱ्यावर येताच आमदार बनसोडे यांच्या विनंतीनुसार जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमात नियोजित नसतानाही शिंदे यांनी बनसोडे यांच्या कार्यालयाला भेट दिली.

Alandi : आळंदी शहराला पाणीपुरवठ्यालाअजूनही विलंब ; पाणी समस्येमुळे शहरात नागरिक हैराण

त्यामुळे बनसोडे हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे. बनसोडे यांची शिंदे यांच्याशी जवळीक वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे उपस्थित होते. मार्च महिन्यात झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार बनसोडे यांची भूमिका शेवटपर्यंत संभ्रम निर्माण करणारी राहिली. बनसोडे यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबतचा फोटो मोबाईलवरील व्हॉटट्सअप डीपी ठेवला होता. त्यामुळे बनसोडे यांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत संभ्रमावस्था राहिली.

शहरात विधानसभेचे पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन मतदारसंघ आहेत. त्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. सन2009 च्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे ( NCP) विधानसभेत गेले. त्यांनी भाजपच्या अमर साबळे यांचा पराभव केला. 2014मध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. त्यात शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी बनसोडे यांचा पराभव केला. त्यानंतर पाच वर्षे बनसोडे राजकीय विजनवासात गेले होते.

सन 2019 ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढायचे की दुस-या पक्षात जायचे या द्विधा मनस्थितीत बनसोडे असतानाच पक्षाने त्यांच्याऐवजी संत तुकारामनगरच्या तत्कालीन नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे बनसोडे यांची भंबेरी उडाली. जुन्या लोकांना एकत्र करुन अजित पवार यांच्याकडे धाव घेतली. पवार यांनी शिलवंत यांची जाहीर केलेली उमेदवारी रद्द करुन बनसोडे यांना उमेदवारी दिली आणि बनसोडे दुस-यांदा ‘घड्याळा’वर विधानसभेत पोहोचले. त्यांना भाजपच्या तत्कालीन नगरसेवकांनी मदत केल्याचे आजही उघडपणे बोलले जात आहे.

आमदार म्हणून निवडून आल्यापासून बनसोडे हे पक्षापासून फटकून राहत असल्याचे वारंवार दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना बनसोडे पक्षाच्या नेत्यांसोबत अधून-मधून दिसत होते. मात्र, राज्यातील सरकार गेल्यानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असताना बनसोडे पक्षासोबत कधीच दिसत नाहीत. शहर संघटनेकडून विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली जात आहेत. पण, शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले बनसोडे मात्र एकाही आंदोलनाला फिरकल्याचे दिसून आले नाही.

त्यातच आता मुख्यमंत्री शिंदे यांनी  जनसंपर्क कार्यालयाला भेट दिल्याने बनसोडे हे शिवसेनेत जाणार का,  याची चर्चा शहराच्या राजकारणात सुरु झाली आहे. दरम्यान, अण्णा बनसोडे चांगला कार्यकर्ता असून सदिच्छा भेट आहे. कोणताही राजकीय अर्थ काढू नका असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर, मी 25 वर्षापासून अजितदादांच्या मार्गदर्शनखाली काम करत आहे. आता तरी मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट होती. आगामी निवडणूक ( NCP) राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचे आमदार बनसोडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.