Bhosari : ॲमेझॉन कंपनीचे दहा लाखांचे पार्सल ट्रक चालकांनी केले लंपास

एमपीसी न्यूज – बेंगलोरहून पुण्याला ॲमेझॉन कंपनीचे पार्सल कंटेनर मधून घेऊन येत असताना कंटेनर चालकांनी दहा लाख 24 हजार रुपयांचे पार्सल लंपास केले. ही घटना 26 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर अन्य तिघे अद्याप फरार आहेत.

मयुरेश मोहन वडके (वय 37, रा. भिवंडी ठाणे) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कुशल राजेंद्र सिंग चौधरी (रा. उत्तर प्रदेश), राजकुमार कालीचरण दिमर (रा. उत्तर प्रदेश), प्रल्हाद सुखराम (रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर लोकेशकुमार सुलतानसिंग, बिजू, केशव (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे तिघे अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या कंटेनर वर कुशल आणि राजेंद्र सिंग चालक म्हणून काम करतात. राजकुमार एमएच 04 जेयू 1106 हा कंटेनर चालवतो. त्यावर प्रल्हाद व केशव क्लीनर म्हणून काम करतात. तर कुशल एम एच 04 एचडी 9901 हा कंटेनर चालवतो. लोकेश आणि बिजू यावर क्लीनर म्हणून काम करतात. मयुरेश यांनी बेंगलोर येथून ॲमेझॉन कंपनीचे पार्सल कंटेनरमध्ये भरून दिले. हे पार्सल पुणे येथे न्यायचे होते. सर्व आरोपींनी मिळून 16 एप्रिल आणि 26 एप्रिल या दोन फेऱ्यांमध्ये कंटेनर मधून दहा लाख 24 हजार रुपये किमतीचे 94 पार्सल काढून घेतले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.