Birthday Special: साक्षी धोनीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीत आलेली कियारा अडवानी

Birthday Special: Kiara Advani famous for her role as Sakshi Dhoni ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामुळे तिच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं.

एमपीसी न्यूज – एखाद्या जगप्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात काम करताना प्रत्यक्षातील त्या व्यक्तीशी नेहमी तुलना होते. बायोपिकमध्ये काम करण्याचा तो कधी कधी फायदा पण असतो तर कधी तोटा देखील. पण यामुळे एखाद्या व्यक्तीचे नशीब उघडू देखील शकते. अशाच संधी आली अभिनेत्री कियारा अडवानीच्या आयुष्यात जेव्हा तिने ‘एम.एस. धोनी- द अनडोल्ट स्टोरी’ या चित्रपटात साक्षीची म्हणजे धोनीच्या पत्नीची भूमिका साकारुन प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिचं सौंदर्य, तिचा साधा अभिनय प्रेक्षकांना खूपच आवडला. आज कियारा अडवानीचा वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

‘एम. एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरीमुळे सुशांतसिंह राजपूतला देखील प्रचंड फेम मिळाले. तीच गोष्ट कियाराच्या बाबतीत देखील झाली. त्यानंतर आलेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटामुळे तिच्या करिअरला एक वेगळंच वळण मिळालं.

या चित्रपटातील एका दृश्यामुळे कियारा चर्चेचा विषय ठरली. ‘लस्ट स्टोरीज’नंतर ‘कबीर सिंग’मध्ये प्रीतीची भूमिका साकारत तिने तरुणांची मनं जिंकली. या दोन चित्रपटांचा कियाराच्या करिअरमध्ये खूप मोठा वाटा आहे.

खरंतर कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर 2016 मध्ये ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर तिने कधी मागे वळून पाहिलंच नाही.

‘लस्ट स्टोरीज’मध्ये आव्हानात्मक भूमिका साकारल्यानंतर कियाराला ‘भारत अने नेनू’, ‘कलंक’, ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’ या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. ‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, कियाराची एकूण संपत्ती जवळपास 21 कोटी इतकी आहे.

कियाराचा नेटफ्लिक्सवरील ‘गिल्टी’ हा चित्रपटसुद्धा चर्चेत राहिला. भविष्यातही कियाराकडे अनेक चित्रपटांचे ऑफर्स आहेत. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’मध्ये झळकणार आहे. त्याचसोबत ‘भुलभुलैय्या 2’, ‘इंदू की जवानी’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.