Pimpri : विस्कळीत पाणीपुरवठ्यावरुन भाजप नगरसेवक अन् आयुक्तांमध्ये ‘वादावादी’

विस्कळीत पाणीपुरवठा, सत्ताधारी भाजप नगरसेवकाने अडविले स्थायी सभागृहाचे दार!

एमपीसी न्यूज – पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असताना आणि ऐन सनासुदीत पिंपळे निलख, विशालनगर, वाकड भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. याच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी आधी पाणी द्या, मग सभा घ्या, अशी भूमिका घेत स्थायी समितीचे ‘दार अडविले’. तसेच आयुक्तांना सभेला जाण्यापासून रोखल्याने आयुक्तांसह सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची वादावादी झाली.

पिंपळे निलख, विशालनगर आणि वाकड हा भाग शहराचे शेवटचे टोक आहे. या भागात सतत विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांकडून तक्रारींचा भडीमार सुरू आहे. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत असताना प्रशासन आपल्याच कारभारात दंग आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. याकडे थेट महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांसह नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिका मुख्यालय गाठले.

स्थायी समितीची आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. स्थायी समिती सभागृहाच्या प्रवेशद्वाला कामठे कुलूप लावत असतानाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले त्यावरुन त्यांच्यात झटापटी झाली. कामठे यांनी प्रवेशद्वाराला कडी लावली. तसेच स्थायीच्या विशेष बैठकीला जाणाऱ्या अधिकारी व सदस्यांना आत जाण्यास मज्जाव केला. आयुक्त हर्डीकर देखील येथे आले. आयुक्तांना स्थायीच्या दारासमोर अडवून त्यांना जाब विचारला.

यावेळी आयुक्त व कामठे यांच्यात वाद झाला. या आंदोलनाचे चित्रीकरण करत असताना आयुक्तांनी हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याने वाद आणखीनच चिघळला. संतापलेले आयुक्त सभा सोडून परत निघाले. मात्र, सभापती विलास मडिगेरी यांनी त्यांची समजूत काढली. दरम्यान, दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन आयुक्तांकडून नगरसेवकांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.