Blog: डॉक्टरांचा सामाजिक बहिष्कार ही काय भानगड आहे?

Blog by Harshal Alpe: What is the social exclusion of doctors?

एमपीसी न्यूज – औरंगाबादमध्ये एका डॉक्टरवर सामाजिक बहिष्कार घातल्याची घटना नुकतीच घडली. त्यावर एमपीसी न्यूजचे वाचक हर्षल आल्पे यांनी लिहिलेला हा ब्लॉग….

कोरोना योद्ध्यांचा सन्मान करा, सामाजिक बहिष्कार हा तर करंटेपणा! 

औरंगाबादमध्ये एका डॉक्टरवर सामाजिक बहिष्कार घातल्याची बातमी नुकतीच समाज माध्यमांवर वाचायला मिळाली, कारण काय? तर त्यांच्याकडे आलेला रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह निघाला, बाकी लोकांना तेथील प्रशासनाने क्वारंटाईन केले, इतर सोपस्कारही केले गेले, मात्र त्या डॉक्टरांवर त्यांच्या आप्तस्वकीयांनी आणि इतरांनीही बहिष्कार घातला आणि बोलणेही बंद केले. खरं तर कोविड 19 च्या या संकटकाळात जिथे डॉक्टरांची आणि नर्सेसची कमतरता जाणवत असताना, अशा घटनांनी जे इच्छुक खाजगी डॉक्टर्स आहेत ते पुढे यायला धजावतील का, हा खरा प्रश्न आहे.

अजून एका बातमीकडे लक्ष वेधले पाहिजे, ते म्हणजे, अनेक कोविड सेंटर्स तयार करण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील असताना ती सुरू करण्यात अडचणी येत आहेत, कारण एकच की हे सगळे उभे करण्यास डॉक्टर्स आणि स्टाफच उपलब्ध होत नाही. असे असताना समाज म्हणून आपण सहकार्य करायलाच हवे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्समध्ये उपचारासाठी जागाच नाही. अशावेळी जर स्वेच्छेने कोणी पुढे येत असेल तर त्यांचा बहिष्कार नाही तर सन्मान व्हायला हवा. योद्ध्यांचा नेहमीच सन्मान होतो, सत्कार होतो, बहिष्कार नाही होत, जे लोक, आणि जो समाज अशांच्या विरोधात बहिष्काराच अस्त्र उपसतो, तो समाज आपले करंटेपण सिद्ध करतो.
वेळीच जागृत होऊन या देवकार्य करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे बक्षीस देऊयात! त्यांना अधिकाधिक  काम करण्यासाठी प्रोत्साहित करुयात! एवढेच राहुन राहुन वाटते….

 लेखक: हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.