Web Series: शू SSS…प्रियदर्शन जाधव घेऊन येतोय एक ‘हॉरर वेबसीरिज’

priyadarshan jadhav and shivaji lotan patil's new web series bhutatlela will be released on june first week

एमपीसी न्यूज- बरेच दिवसात हॉरर सीरीज बघितली नाही का? मग खास तुमच्यासाठी राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक शिवाजी लोटन पाटील व लोकप्रिय अभिनेता प्रियदर्शन जाधव अशीच एक हॉरर सीरीज घेऊन येत आहेत. त्यांनी या सीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केले आहेत. ‘भुताटलेला’ असं या वेब सीरिजचं नाव असून जूनच्या पहिल्‍या आठवड्यामध्‍ये मराठी व हिंदी भाषेमध्‍ये ती प्रदर्शित केली जाणार आहे.

हंगामा डिजिटल मीडिया व कॅफे मराठी यांची निर्मिती असलेल्‍या या वेब सीरिजचे लेखन योगेश शिरसाट यांनी केले आहे. तर त्यात प्रियदर्शनसोबत सुरभी हांडे व सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

याविषयी शिवाजी लोटन पाटील म्‍हणाले, ‘ओटीटी व्‍यासपीठांनी कथानकाचे नवीन विचार, संकल्‍पना व स्‍वरूपांसह प्रयोग करण्‍यासाठी व्‍यापक मुभा दिली आहे. मी प्रियदर्शनसोबत डिजिटल विश्‍वामध्‍ये पदार्पण करण्‍यासाठी खूप उत्‍सुक आहे.

यापूर्वी मी त्‍याच्‍यासोबत ‘हलाल’ चित्रपटामध्‍ये काम केले आहे. या शोमध्‍ये हास्‍य व थरार यांचे उत्तम संयोजन आहे आणि प्रेक्षक या शोची कथा व कलाकारांचा अभिनय पाहून निश्चितच सीरिजचं भरभरून कौतुक करतील’.

आपल्‍या डिजिटल पदार्पणाबाबत बोलताना प्रियदर्शन म्‍हणाला, ‘ओटीटीवर विविध शैलींमधील अनेक कथा सादर केल्या जातात आणि या कथा आता मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.

हे व्यासपीठ कलाकारांना देखील त्‍यांची कौशल्‍ये वाढवण्‍याची, तसेच विविध प्रकारच्‍या भूमिका साकारण्‍याची आणि त्यांच्यामधील वैविध्‍यता दाखवण्‍याची संधी देतात. मला अशा रोमांचक कथेचा भाग बनण्‍याची संधी मिळाली तसेच या शोमुळे पुन्‍हा एकदा शिवाजीसोबत काम करण्‍यास मिळालं, त्यामुळे मी खूप खूश आहे’.

‘भुताटलेला’ ही सीरिज हंगामा प्‍लेवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे विनोदी हॉरर सीरिजच्या चाहत्‍यांना लवकरच मनोरंजनाची नवीन पर्वणी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.