BopKhel News: खडकीला जोडणारा पुल तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी खुला करा; उमपहापौर हिरानानी घुले यांची मागणी

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासीयांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे काम पूर्ण झाले. केवळ संरक्षण विभागाच्या हद्दीतील काम सुरू असून ठेकेदारांच्या वाहनांची या पुलावरुनच वाहतूक होत आहे. वाहतुकीचा संरक्षण विभागाच्या हद्दीतील कामाला कोणताही अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे सहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्याकरिता मोठा वळसा घालावा लागत असलेल्या बोपखेलवासीयांकरिता हा पुल आयुक्तांनी स्वतःच्या अधिकारात तात्पुरत्या स्वरुपात खुला करावा, अशी आग्रही मागणी उपमहापौर हिरानानी घुले यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात उपमहापौर घुले यांनी म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला होता.  त्यामुळे बोपखेलवासीयांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. त्यासाठी महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला.

दळणवळणचा एकमेव असलेला मुख्य मार्ग बंद झाल्याने बोपखेलमधील नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत.  मागील सहा वर्षांपासून बोपखेलमधील नागरिक मोठा वळसा घालून पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. त्यांचा पैसा आणि वेळ वाया जात आहे. बोपखेलमधील नागरिक सहनशील आणि सहकार्य करणारे आहेत. रस्ता बंद झाल्यानंतर बोपखेलचे नागरिक मुळा नदीवरील तरंगत्या पुलावरुन ये-जा करत होते. संरक्षण विभागाला कोणताही त्रास होऊ दिला नाही. संपूर्ण काळजी घेऊन नागरिकांनी ये-जा केली. कोणतीही दुर्घटना घडली नाही. बोपखेलमधील नागरिक संरक्षण विभागाला नेहमीच सहकार्य करतात.

आता  बोपखेल ते खडकीला जोडणा-या पुलाचे काम पूर्ण झाले. त्यावरुन वाहतूक करण्यासाठी संरक्षण विभागाच्या जागेतील पुलाच्या कामास कोणताही अडथळा निर्माण होत नाही. बोपखेलमधील नागरिकही शिस्तीत या पुलावरून वाहतूक करू इच्छित आहेत. सर्व नियमांचे पालन केले जाईल. कामाला कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी आम्ही बोपखेलवासीय सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत.

गेल्या सहा वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठी होत असलेले हाल थांबवावेत. वेळ आणि वाहतुकीसाठी खर्च होणारा वेळ आणि कमी करावा.  त्यामुळे नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून खडकीला जोडणारा पुल आपल्या अधिकारात तात्पुरत्या स्वरुपात सुरु करावा. संरक्षण हद्दीतील पुलाच्या कामाला कोणताही अडथळा होत नाही. तरीही, काही समस्या उद्भवू नये, सुरक्षिततेसाठी महापालिकेने तेथे दिवसा सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी उपमहापौरघुले यांनी केली. संरक्षण विभागाच्या हद्दीतील कामाला गती द्यावी. लवकरात-लवकर ते काम पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.