School Reopening : राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिक्षणोत्सव साजरा, 80 टक्क्यांहून अधिक शाळा सुरू

एमपीसी न्यूज : सोमवारपासून राज्यातील शहरी भागातील 8 वी ते 12 वी तर ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी 20 जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून 83 टक्के शाळा सुरू झाल्या. तर 47 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. रात्री 9 पर्यंतच्या माहितीमध्ये राज्यातील आणखी काही जिल्ह्यांची माहिती येणे अपेक्षित असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला असून विविध पद्धतींनी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

राज्यातील 20 जिल्ह्यातील शाळांच्या माहितीनुसार ग्रामीण व शहरी भाग मिळून एकूण 32 हजार 13 शाळा आहेत, त्यापैकी 26 हजार 694 शाळा सोमवारी सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये ग्रामीणमधील आणि शहरी भागातील मिळून 54 लाख 15 हजार 136 विद्यार्थी आहेत. त्यापैकी सोमवारी 25 लाख 37 हजार 334 विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती दर्शविल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.