WhatsApp, Facebook, Insta resumed : तब्बल सहा तासानंतर व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टा पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज : फेसबुकची मालकी असलेले फेसबुक, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम एकाच वेळी डाऊन झाले. सोमवारी रात्री 9 नंतर अचानक झालेल्या या प्रकारामुळे युजर्सही गोंधळून गेले.  आता  तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तब्बल सहा तासानंतर पुन्हा सुरळीत झाले आहेत. 

 सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक अडचण येऊ लागली. नेमकी काय अडचण आहे हे स्पष्ट होत नसल्याने सर्वच नेटकरी आणि सोशल मीडिया प्रेमी एकमेकांशी मोबाईलवर संपर्क करून विचारणा करीत होते.

एकाचवेळी तिन्ही सोशलमीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले असल्याने जगभरात प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यातच सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमके कारण काय आहे, हे समजू शकत नसल्याने अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.

सर्व्हर अचानक बंद झाल्याने होता गोंधळ

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या होत्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स बंद पडले होते. साधारणतः दीड ते दोन तास हा प्रकार सुरू होता. व्हॉट्सअ‌ॅप नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नव्हते. त्याचबरोबर व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचणी येत होत्या. फेसबुक, इन्स्टाग्राम रिफ्रेश होत नसल्याने नवीन अपडेट कळत नव्हते.

ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड

व्हॉट्सअ‌ॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नव्हते. व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक यांचे सर्व्हर डाऊन झाल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी ट्विट करत सर्वांना तशाच अडचणी येत आहेत का? अशी शंका विचारली. अवघ्या काही क्षणात ट्विटरवर या संदर्भात इतके ट्विट आले की हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करायला लागला आहे.

सहा तासांनंतर सेवा पुन्हा सुरळीत

भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास व्हाट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू झाले आहे. सर्व्हर का डाऊन झाले याबाबत अद्यापही कोणतीही माहिती नसली तर यामागे सायबर हल्ला असल्याचे काही तज्ञ म्हणणे आहे तर डीएनएस अडचण निर्माण झाल्याने हा प्रकार झाला असावा असे काही तज्ञ म्हणतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.