Chakan: ‘टाईमपास’ मधून झालेल्या भांडणात तरुणाचा विहिरीत ढकलून खून, मित्राला अटक

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन सुरू असल्याने टाईमपास  करण्यासाठी मित्रासोबत शेतात बसलेल्या एका तरुणाला त्यावेळी झालेल्या भांडणातून मित्राने विहिरीत ढकलून दिले. त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी खेड तालुक्यातील भांबोली येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या आरोपावरून मित्राला अटक केली आहे.

योगेश प्रकाश पडवळ (वय 34, रा. शेलू, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर दिलीप गणपत घावटे (वय 32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणपत विष्णू घावटे (वय 55, रा शेलू, ता खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने बाहेर फिरण्याऐवजी शेतात जाऊन वेळ घालवला असा मयत दिलीप आणि आरोपी योगेश यांनी विचार केला. गुरुवारी सकाळी ते दोघे भांबोली गावातील बाबाजी लक्ष्मण पडवळ यांच्या शेतात टाईमपास करण्यासाठी गेले. त्यावेळी दिलीप आणि योगेश यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्या वादातून योगेश याने दिलीप यांना जवळच असलेल्या विहिरीत ढकलून देत त्यांचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.