Chakan : कोरेगाव भीमा बंदोबस्तावरील विशेष पथकाचा सन्मान

एमपीसी न्यूज – गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. तसेच एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या दंगलीचे परिणाम देशभरात उमटले होते. त्यामुळे यंदा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नेमलेल्या पोलीस पथकाने केलेल्या कामगिरीचा वरिष्ठ पोलीस प्रशासनाने गौरव केला आहे. आव्हानात्मक बंदोबस्त अतिशय कौशल्याने कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता हाताळल्याबद्दल या पथकातील पोलिसांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले.

गेल्या वर्षी १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरेगाव भीमा परिसरात शौर्यदिनासाठी पोलीस प्रशासन महिनाभर आधीच सज्ज झाले होते. पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त, एस. आर. पी. एफच्या तुकड्या, शेकडो होमगार्ड तैनात करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलीस आधीक्षक संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण विशेष शाखेचे पोलीस अधिकारी आणि आणि कर्मचारी यांचे पथक महिनाभर आधीपासून कार्यरत करून माहिती मिळवणे, शांततेस बाधा ठरतील अशा लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या उपाययोजना करण्यासाठी पाठविले होते.

  • सहायक फौजदार संजय भोंडवे, रामदास भोसले, मुस्ताक शेख,पोलीस हवालदार किशोर कोरडे, रविंद्र मोहरकर, पोलिस नाईक स्वप्नील मोरे, पोलीस शिपाई विनोद काळे, महिला पोलीस सुजाता भुजबळ, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजू मोरे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे आदींचा या विशेष पथकात समावेश होता. कायदा आणि सुव्यस्थेची माहिती घेणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एक महिना आधीपासून हे पथक कार्यरत होते.

यंदाच्या वर्षी या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध काम केल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने या पथकातील सर्वांचा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे–पाटील पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.