Chakan : वाहने सोडविण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पकडलेले वाहन सोडविण्यासाठी व दुसऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागून त्यातील 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 20) दुपारी बाराच्या सुमारास चाकण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली.

पोलीस नाईक शरद कृष्णा लोखंडे (वय 36) आणि आनंदा नामदेव शिवले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चंद्रकांत शिवाजी धरणे (वय 28) यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धरणे यांची ब्रिझा कार पोलिसांनी पकडली. तसेच त्यांच्या ट्रकवर कारवाई करण्यात येत होती. पकडलेली कार सोडण्यासाठी व ट्रक वरील कारवाई टाळण्यासाठी पोलीस नाईक शरद लोखंडे यांनी चंद्रकांत यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शरद लोखंडे आणि त्याच्या एका साथीदाराला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.