Chinchwad : नव्या आयुक्तालयाचा शहरातील गुन्हेगारीवर वचक

पिंपरी-चिंचवड शहरातील क्राईम रेट घटला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले. त्यामुळे शहरात पोलिसांचा राबता वाढला. तसेच विविध पथकांची नेमणूक आणि पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांचे कौशल्य कामाला आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्ह्यांच्या आकडेवारीमध्ये मोठा फरक पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारी कमी झाली आहे. तसेच शहरातील टोळीयुद्धांना आवरण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत होता. शहराची लोकसंख्या, त्यांच्या गरजा वाढल्यामुळे गुन्हेगारी देखील काही प्रमाणात वाढत होती. शहरात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. आयुक्तालयात सुरुवातीला दोन गुन्हे शाखा तयार करण्यात आल्या. त्यातच आता वाढ करून 15 पोलीस ठाण्यांसाठी पाच गुन्हे शाखांची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी पोलीस आणि नागरिक यांचा समन्वय साधण्यासाठी तसेच नागरिकांच्या मदतीला पोलीस यंत्रणा वेळेत पोहोचण्यासाठी ‘पोलीस टीम’ ची संकल्पना राबवली. पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यामुळे शहरात फिरू लागले. त्याचबरोबर गुन्हे शाखांची पथकांची देखील शहरात गस्त वाढली.

पोलिसांचा राबता शहरात वाढल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला. शहरात पूर्वी होणारी टोळीयुद्धे शमली आहेत. काही टोळ्यांचे म्होरके आपापसातील भांडणात मारले गेले. जे उरले ते कारागृहात गेले. शहरात लहान-मोठ्या घटना घडत राहिल्या. अपवाद वगळता त्या सर्व घटनांची पोलिसांनी उकल केली. जानेवारी ते मे 2018 या पाच महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 31 खून झाले. त्यातील 28 खुनांची उकल झाली. तर याच कालावधीत 27 खून झाले. त्यातील 26 खुनांची उकल झाली. पिंपरी पोलीस ठाण्यातील एका खुनाचा अपवाद वगळता सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कित्येक दिवस आरोपीच्या शोधात राज्याबाहेर देखील फिरले. मात्र आरोपीला पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यश मिळाले. पिंपरी पोलीस अजूनही त्या आरोपीच्या मागावर आहेत.

जानेवारी ते मे 2018 या पाच महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 59 जणांवर प्राणघातक हल्ले झाले. तर यावर्षी प्राणघातक हल्ल्याच्या 33 घटना घडल्या. दोन्ही वर्षी पोलिसांना या गुन्ह्यांचा तपास करण्यात यश आले आहे. मागील वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत 20 दरोडे पडले. त्यातील 19 दरोड्यांचा पोलिसांनी तपास केला. तर यावर्षी पाच महिन्यांच्या कालावधीत 12 दरोडे पडले. त्यातील 11 दरोड्यांची उकल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.