Chakan : पैसे म्हणून दिले पांढरे कागद; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटर बाहेर उभा असलेल्या तरुणाला रुमालात 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगितले. त्याच्याकडून रोख 11 हजार रुपये घेऊन त्याला पैसे म्हणून पांढरे कागद देऊन तिघांनी पोबारा केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. ही घटना सोमवारी (दि. 25) सकाळी दहाच्या सुमारास चाकण गावात घडली.

प्रतापसिंग शंकरदीप राजपूत (वय 38, रा. आधारवाडी, कल्याण, ठाणे), सतीश भगवान रणदिवे (वय 25, रा. बदलापूर, ठाणे), योगेश कडूबा सोनवणे (वय 65, रा. उल्हासनगर, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दीपककुमार गोविंद गुप्ता (वय 20, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 11 हजार रुपये गावी पाठवायचे होते. त्यासाठी ते चाकण गावातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरबाहेर रांगेत थांबले होते. त्यांच्या पुढे आरोपी देखील रांगेत थांबले होते. आरोपींनी संगनमत करून त्यांच्या जवळ असलेल्या निळ्या काळ्या रंगाचा रुमालमध्ये 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे भासवले. त्या पैशांच्या बदल्यात आरोपींनी दीपककुमार यांच्याकडून 11 हजार रुपये रोख घेतले आणि आरोपींनी तिथून पोबारा केला. त्यानंतर दीपक कुमार यांनी रुमाल उघडून बघितला असता त्यात पांढऱ्या रंगाचे कागद आढळून आले. चाकण पोलिसात याबाबत तक्रार देताच पोलिसांनी तिघांना अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.