Chakan : अन्यायकारक विकास आराखडा; चाकणला धरणे आंदोलन  

विकास आराखाडा रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – चाकणचा विकास आराखडा सदोष झाला असून अनेकांच्या वडिलोपार्जित संपूर्ण जमिनी बाधित झाल्या आहेत. त्यामुळे चाकण विकास आराखाडा रद्द करून चाकण सह 16 गावांसाठी एकात्मिक विकास योजना करावी या मागणीसाठी चाकण नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Pune : प्रसिद्ध गायक किशोर कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

चाकण विकास मंचच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय सहभागी झाले होते. चाकणचा विकास आराखाडा शासनास सादर झाला असून तो रद्द व्हावा अशी मागणी यावेळी सर्वांनी केली.  प्रशासनातील अधिकार्यांनी कायद्याचे पालन न करता या बाबतची प्रक्रिया केली आहे. अनेक विकसक मंडळीकडून मोठ्या प्रमाणावर तत्कालीन पालिकेतील पदाधिकार्यांनी पैसे घेऊन आरक्षणात फेरफार केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला.

सध्या चाकण पालिकेवर प्रशासक आहे.  लोक नियुक्त कमिटी स्थापित झालेली नसताना अशा प्रकारे विकास आराखड्याची कार्यवाही करून जनतेला वेठीस धरले जात असल्याचे बाधित शेतकर्यांनी यावेळी सांगितले.  या विकास आराखड्यातून बिल्डर हिताची कामे करण्यापलीकडे काही एक झाले नाही असा आरोप उपस्थित आंदोलकांनी केला. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला व जन विरोधी विकास आराखाडा अन्यायकारक असल्याचे सांगितले.

यावेळी विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, चाकणचे माजी उपसरपंच कालिदास वाडेकर, ॲड.निलेश कड, महेश शेवकरी, अमोल घोगरे , जमीर काझी, लक्ष्मण वाघ, बाळासाहेब गायकवाड ,अनिल देशमुख, मुबीन काझी, मीना गोरे, सुरेश कांडगे , अशोक जाधव , अमोल जाधव, भरत गोरे , शेखर पिंगळे, स्वामी कानपिळे, उमेश आगरकर, चंद्रकात गोरे आदींनी विकास आराखडा रद्द करण्याची जोरदार मागणी केली.

चाकणचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी चाकण पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

… त्या पदाधिकाऱ्यांवर रोष 
चाकण पालिकेच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाने विकास आराखडा लादला गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यातील कुणीही याठिकाणी उपस्थित राहिले नसल्याकडे अनेकांनी लक्ष वेधले. त्या कार्यकारी मंडळातील केवळ दोन स्वीकृत नगरसेवक याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी मात्र विकास आराखड्यास विरोध असल्याची भूमिका यावेळी मांडली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.