Charholi: च-होली, डुडूळगावच्या जागेचे पीएमपीएमलकडे हस्तांतरण 

पीएमपीएलचा बसडेपो उभारण्याचा मार्ग मोकळा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाला च-होलीतील सर्व्हे नंबर 129 व 130  मधील साडेतीन एकर आणि डुडूळगाव जकात नाक्याची एक एकर जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. ही जागा तीस वर्षांच्या कालावधीसाठी पीएमपीएलकडे देण्यात आली आहे. याठिकाणी बस डेपो उभारण्यात येणार असून बस पार्किंग, दुरुस्तीची कामे करण्याची व्यवस्था झाली आहे. त्याचबरोबर देहू, आळंदीसह आसपासच्या परिसरातील शेतक-यांना, नागरिकांना मार्केटयार्ड व अन्य महत्वाच्या ठिकाणी येण्यासाठी पहाटे पासून बससेवा उलब्ध होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल) हे पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्ही महापालिका हद्दीपासून 20 किलोमीटर परिघ क्षेत्रासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरवित आहे. पीएमपीएलमध्ये सद्यस्थितीत 1450 बस व भाडेतत्वावरील 662 बस अशा मिळून एकूण 2112  बसगाड्यांचा ताफा आहे. आगामी काळात पीएमपीएलच्या ताफ्यात नव्याने इलेक्ट्रिक व सीएनजी मिळून अशा एक हजार बस दाखल होणार आहेत.

या बसगाड्यांची पार्कींगची सोय, तसेच देखभाल-दुरूस्तीसाठी बसडेपोची गरज असते. या सर्व बस पार्किंगसाठी पीएमपीएलकडील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शेकडो बसचे पार्किंग रस्त्यावरच केले जात आहे. त्यातूनच बसच्या विविध पार्ट्सची चोरी, तसेच नुकसान होवून अर्थिक भार वाढत आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेकोनातून सर्व बसचे पार्किंग संरक्षित जागेमध्ये होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखभाल-दुरूस्तीसाठीही जागेची गरज असून त्यासाठी जागेची आवश्यकता होती.

पीएमपीएलतर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका तथा अध्यक्षा नयना गुंडे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची याबाबत एक बैठक देखील झाली होती. आरक्षित ताब्यातील जागा पीएमपीएलकडे हस्तांतरित करण्याबाबत या बैठकीत तत्वत मान्यता देण्यात आली होती.

त्यानुसार च-होली येथील सर्व्हे नंबर 129 व 130  मधील साडेतीन एकर आणि डुडूळगाव जकात नाक्याची एक एकर जागा पीएमपीएलकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. ही जागा तीस वर्षांच्या कालावधीसाठी पीएमपीएलकडे देण्यात आली आहे. या दोन जागांमध्ये सुमारे 100 बसेसचे पार्किंग व देखभाल दुरुस्तीची सोय होणार आहे. डुडूळगाव येथील एक एकर जागेत सुमारे 25 बसेस पार्क होऊ शकणार आहेत. या जागेत बस पार्किंगचे नियोजन केले जाणार आहे. आळंदीला जाणा-या बसेसपैकी सुमारे 25 बसेसचे रात्रीचे पार्किंग डुडूळगाव येथे केले जाणार आहे. त्यामुळे बसेसचे किलो मीटर अंतर कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे. तसेच देहू, आळंदीसह आसपासच्या परिसरातील शेतक-यांना तसेच नागरिकांना मार्केटयार्ड व अन्य महत्वाच्या ठिकाणी येण्यासाठी पहाटे पासून बससेवा उलब्ध होणार आहे.

च-होली येथील साडेतीन एकर जागेत मिनी डेपो म्हणजेच साधारणपणे 75 बसचा डेपो करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. त्यामध्ये पार्किंगसह बसची देखभाल दुरुस्ती, संचलन नियोजन अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. यामुळे च-होली आणि आसपास सुरु असलेल्या मोठ्या निवासी, औद्योगिक प्रकल्पातील नागरिकांना सक्षम, सुरळीत, दर्जेदार बससेवा देणे शक्य होणार आहे.

या जागा ताब्यात मिळण्यासाठी महामंडळातर्फे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर, मंडळाचे पिंपरी-चिंचवडमधील समन्वय अधिकारी संतोष माने, कार्यकारी स्थापत्य अभियंता दत्तात्रय तुळपुळे यांनी पाठपुरावा केला. महापालिकेच्या भुमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे यांनी पीएमपीएल मंडळाला जागा हस्तांतरणासाठी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.