Chichwad : लग्न ही सहजपणे घडून येणारी एक घटना नाही -स्मिता जोशी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा वाणिज्य व संगणकशास्त्र महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवण अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय समुपदेशन या विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या समारोपप्रसंगी पुणे कौटूंबिक न्यायालयाच्या ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी बोलत होत्या. याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

ज्येष्ठ समुपदेशक स्मिता जोशी पुढे म्हणाल्या, हल्ली लग्नानंतर पती-पत्नीचे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, एकट्या महाराष्ट्रातच सत्तावन्न हजार अर्ज विविध न्यायालयात दाखल आहे. पुणे-मुंबईतच सतरा हजाराच्या आसपास न्यायालयात प्रकरणे चालू आहे. त्यात 80 टक्के प्रेमविवाह केलेल्याचा समावेश आहे. मुलाने आई-वडीलांच्या संमतीशिवाय लग्न केल्यामुळे त्याचा लग्नाला व मुलीला आई-वडीलांचा योग्य तो पाठींबा न दिल्याचे दिसून येते, शेवटी अनेक मुली लग्नानंतर न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेत आहे.

कौटुंबिक, आर्थिक, स्वभाव, भांडणे, आवड, निवड आदी कारणांमुळेही घटस्फोट होत आहे. काहीच्या पालकांना व मुलींना डॉक्टर, इंजिनिअर लठ्ठ पगाराचा पती अपेक्षित असतो. परंतू, लग्नानंतर माझा पती मला वेळ देत नाही. सततची भांडणे आदी कौटूंबिक कलहामुळे दुरावा निर्माण होत आहे.

एकत्र कुटूंब पद्धतीमध्येही अंतर्गत कलहामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हल्ली मुले, मुली देखील शिक्षण, स्वताचे घर आदीकडेच जास्त ओढा आहे. करीअर करण्याचा नादात आज मुलीचे वय 30 ते 35 झाले की, मग तडजोड करून जीवन साथीदार निवडतात. तो प्रकार मुलांचा देखील होत आहे.

मुला, मुलींनो लक्षात ठेवा, मैत्री, प्रेम, लग्न यात फरक आहे. लग्नानंतर जबाबदार्‍या वाढतात. डॉक्टर, इंजिनिअर पती हवा असेल तर, त्याच्या नेमक्या जबाबदार्‍या काय आहेत, याची जाणीव लग्नाआधीच व्हायला हव्यात. एक कुटूंब पद्धत हवी का नको. याबाबत मुलींनी आई-वडीलांबरोबर चर्चा आदीच केली पाहिजे.

मुलामुलींनो आधी स्वतःला ओळखा भविष्यात काय चालेल, काय नाही चालणार याबाबतीत स्वताःलाच प्रश्न विचारा. प्रेमात पडला असाल तर, प्रथम आई-वडीलांना विश्वासात घ्या, तरच भविष्यात लग्न टिकेल, कुठल्या वेळी कोणती गोष्ट सांगायची हे ओळखा नाही तर, समुपदेशन केंद्राची मदत घ्या.

लग्न ही सहजपणे घडून येणारी एक घटना नाही. स्वत:ची योग्यता, अपेक्षा यांची सांगड घालून विचार व अनुभव याचा सारासार विचार करून निष्ठेने आणि एकमताने स्विकारलेले नाते, बंधन म्हणजेच लग्न असते. एकमेकांचा विश्वास हा प्रत्येक यशस्वी लग्नाचा महत्त्वाचा पाया आहे. सप्तपदी, कन्यादान, एकमेकांना हार घालणे म्हणजे लग्न नाही.

स्त्रीरोग तज्ञ व वैवाहिक, लैंगिक समुपदेशक डॉ. सागर पाठक म्हणाले, आज लैंगिक सहजीवन घटस्फोटातील 35 टक्के भाग लैंगिक समस्या व विसंवाद हे आहे. पण एक टक्क्यापेक्षा कमी टक्के घटस्फोट मागितला जातो. इतर 34 टक्क्यामध्ये पती-पत्नी ‘तेरी बी चुप मेरी भी चूप’ इतर वेगळ्या कारणांचा आधार घेतात. म्हणून लग्नाआधी व नंतर रक्तगट, एचआयव्ही इत्यादी चाचण्या असतात. लैंगिकता विषयावर मोकळेपणाने बोलणे ही काळाची गरज आहे.

व्याख्यात्या वर्षा कुलकर्णी यांनी योग्य निर्णय कसे घ्यायचे, वेळेचे व्यवस्थापन, इंटरनेटचे व्यसन व वैयक्तिक सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. अश्विनी ओझा यांनी शैक्षणिक जागृकता आणि भावनात्त्मक शिकण्यातील अडचणी आगळीक सक्रियता म्हणजे काय? या विषयावर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून तुम्ही जर तुमचा स्वाभिमान जपला तरच दुसरे तुम्हाला संमान देतील असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे म्हणाले, शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आयुष्यात सकारात्मक पुढे जावे, यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांचा सतत प्रयत्न असतो. तसेच आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे लग्न याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, आवश्यक असल्याने या विषयावर कार्यशाळा आयोजित केली गेली. यावेळी उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया कार्यक्रमाची संयोजिका प्रा. पद्मावती पाटील आदींनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थींनी ऐश्वर्या बिरादार व निकीता गवळी यांनी केले तर, आभार प्रा. पद्मावती पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.