Chikhali : पंचशील फिल्टर कंपनी भीषण आगीत जळून खाक

एमपीसी न्यूज – चिखली येथील पंचशील फिल्टर कंपनीला आज, गुरुवारी पहाटे भीषण आग लागून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आठ अग्निशमन दलाचे बंब आणि 12 खाजगी टँकरच्या मदतीने आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

अग्निशामक अधिकारी ऋषिकांत चिपाडे यानी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी चिखली येथील स्पाईन रोड, घरकुल जवळील ‘पंचशील फिल्टर्स’ नावाची कंपनी आहे. आज (गुरुवारी ) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास या कंपनीला आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार, भोसरी, तळवडे, प्राधिकरण, चिखली आणि संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

मात्र आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता एमआयडीसी हिंजवडी, पुणे मनपा, बजाज कंपनीमधील प्रत्येकी एक बंब आणि चिखली, कुदळवाडी, जाधववाडी आणि मोशी येथील 10-12 पाण्याचे टँकर यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. एमएसईबी कडून विद्युत पुरवठा लवकर खंडित न झाल्यामुळे कंपनी शेजारील ट्रान्सफॉर्मर जवळ खूप जोरात इलेक्ट्रिक स्पार्किंग होत होते व दिवाळी प्रमाणे जोरजोरात फटाके वाजवत असल्याचा भास होत होता.

या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला असता पूर्ण चिखली परिसरातील लाईट बंद झाली. त्यामुळे पवार वस्ती व जवळपासच्या परिसरातील बोअरवेल व विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर्स अकार्यक्षम झाल्यामुळे पाणीपुरवठा करणा-या टँकरला पाणीपुरवठा करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे शेवटी आवश्यक त्या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला.

पंचशील फिल्टर कंपनीमध्ये अग्निशमन यंत्रणा (फायर हैद्रान्ट/ वॉटर स्प्रिंकलर) बसविण्यात आलेले नाहीत. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता अग्निशामक दलाने व्यक्त केली. पहाटे साडेचार वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, मात्र कुलिंगचे काम अजूनही सुरुच आहे.

पंचशील फिल्टर ही कंपनी अक्षय बाफना आणि सुरेश बाफना यांच्या मालकीची आहे. या कंपनीत फिल्टर्स तयार होतात. त्यासाठी फॅब्रिक मटेरियल आणि कागद यांचा उपयोग केला जातो. या साहित्यामुळे आग झपाट्याने पसरली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.