Chikhali News: घरकुलमध्ये मतदार नाव नोंदणी अभियान राबवा – अजय पाताडे

एमपीसी न्यूज – घरकुल वसाहतीमधील नागरिकांचे मतदान स्थानिक जवळपासच्या शाळांमध्ये व घरकुल यादी मध्ये नाव नोंदणी करावी. निवडणूक विभागाने या भागात घरकुल रुग्णालय येथे आठ दिवसाचे मतदार नाव नोंदणी अभियान राबवावे, अशी मागणी भाजपचे उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी केली. याबाबत    भोसरी विधानसभा निवडणूक अधिका-यांना पत्र दिले आहे.

पाताडे यांनी म्हटले आहे की, घरकुल वसाहतीमध्ये रहाणाऱ्या बऱ्याच नागरिकांचे नाव अजूनही स्थानिक मतदार यादीत आलेले नाही. ज्यांची नावे आली आहेत ते एकाच कुटुंबातील मतदान वेगवेगळ्या शाळांमध्ये आहे असे दिसून येते, ती एकत्र असावीत. शासनाच्यावतीने घरकुल ही मोठी एकत्र वसाहत निर्माण करून दिली आहे. त्यामुळे या भागात त्यांना लागणाऱ्या नागरी सुविधा पुरविणे हे महापालिकेची जबाबदारी आहे. हे काम करून घेण्याकरिता या भागातील नागरिकांनी आपल्या पसंतीचा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे.

तरच या भागातील अडचणी दूर होतील. या भागाचा विकास होईल.याचा फायदा घरकुलवासीयांनाच होणार आहे. घरकुलधारक लाभार्थी नुसार कमीत कमी 20 ते 22 हजार मतदान असले पाहिजे. मात्र सध्यातरी आठ हजाराच्या आसपास नावे मतदार यादीत आहेत असे सर्व्हेनुसार समजते. नागरिकांचे मतदार यादी मध्ये नाव  नोंदविण्यातकरिता प्रयत्न चालू आहेत, मात्र निवडणूक विभागाकडून ऑनलाइन /ऑफलाइन मतदार नाव नोंदणी करिता योग्य तो प्रतिसाद मिळत नाही.  घरकुल पासून निवडणूक कार्यालय दूर असल्याने नागरिक कंटाळा करतात,त्यामुळे हा सर्व विस्कळीतपणा आहे.

निवडणूक विभागाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन याच भागात घरकुल रुग्णालय येथे आठ दिवसाचे मतदार नाव नोंदणी अभियान राबवावे. जेणेकरून या भागातील नागरिकांना सोईस्कर होईल. नागरिकांची नावे येथील मतदार यादीमध्ये येतील आणि नागरी सुविधांपासून हे नागरिक वंचित राहणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.