Chikhali News : फ परिमंडळ अधिकाऱ्यांकडून शिधा वाटपाचा आढावा; चिखलीतील रेशनिंग दुकानाला दिली भेट

एमपीसीन्यूज : अन्नधान्य वितरण विभागाच्या भोसरी येथील फ परिमंडळ कार्यालयाच्या वतीने हद्दीतील रेशनिंग दुकानांमधून मोफत धान्य वाटपाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे. या मध्ये आज, शुक्रवारी चिखली-मळेकर वस्ती येथील उषा विक्रम छाजेड या नावाने सुरु असलेल्या अधिकृत रेशनिंग दुकानाला फ परिमंडळ अधिकारी गजाजन देशमुख यांनी भेट देत किती लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले याची माहिती घेतली.

या वेळी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या हस्ते शिधापत्रिका धारकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले. वेळी पुरवठा निरीक्षक बबन माने, वैभव छाजेड, विक्रम छाजेड, आण्णा हजारे, प्रकाश चौधरी आदी उपस्थित होते. या दुकानातून आतपर्यंत 1226 लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातही या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु आहे. लॉकडाउनच्या काळात गोरगरीब नागरिक, कामगार, परजिल्ह्यातून शहरात नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाकडून रेशनिंग दुकानामार्फत प्रति व्यक्ती मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. यामध्ये प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ तसेच नियमित कोट्यानुसार दरमहा दिले जाणारे धान्य मोफत वाटप केले जात आहे. मात्र, रेशन दुकानांमधून या धान्याचे शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना मंजूर कोट्यानुसार वाटप होत आहे की नाही, याचा आढावा  घेतला जात आहे. त्यानुसार प्रत्यक्ष रेशनिंग दुकानांना भेटी देऊन धान्य वाटपाची माहिती घेतली जात आहे. धान्य वाटपाबाबत लाभार्थ्यांच्या काही तक्रारी आहेत का, याचीही विचारपूस केली जात असल्याचे परिमंडळ अधिकारी गजानन देशमुख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.