Chikhali : जाधववाडीत डेंग्यूसदृश्य आजाराने  दोन चिमुकल्यांचा बळी

एमपीसी न्यूज – चिखली, (Chikhali) जाधववाडी येथे गेल्या दोन दिवसात डेंग्यूसदृश्य आजाराने पाच आणि दहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांचा बळी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसात डेंग्यूसदृश्य आजाराने दोन लहानग्यांचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाने परिसरात डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधणे, किटकनाशक फवारणी करणे अशा कोणत्याही उपाययोजना राबवल्या नाहीत, अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.

Pune : तीन गणेश मंडळांतर्फे शनिवार-रविवारी बालनाट्य महोत्सव

शहरामध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढतच आहे. गेल्या तीन महिन्यांत सुमारे 100 जणांना डेंग्यूची लागण झालेली आहे. डेंग्यू आजाराची लागण होणार्‍या काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्स (रक्तातील रक्तबिंबिका) झपाट्याने कमी होतात. शहरात जुलै महिन्यात डेंग्यूचे 36 बाधित रुग्ण आढळले. तर, ऑगस्ट महिन्यात 40 बाधित रुग्ण आढळून आले. लहान मुले आणि तरुणांमध्ये सर्वाधिक डेंग्यूची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डेंग्यूशिवाय चिकुनगुण्या तसेच हिवताप यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भावही शहरात वाढत आहे.

जाधववाडी येथील पाच वर्षीय बालकाला डेंग्यूसदृश्य आजाराने पुण्यातील जहाँगिर रूग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्याने त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 19 सप्टेंबर रोजी बालक दगावले. जाधववाडी येथीलच 10 वर्षीय मुलाला डेंग्यूसदृश्य आजारामुळे 4 सप्टेंबर रोजी पुण्यातील ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यु झाला.

याबाबत बोलताना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, जाधववाडी येथील मृत्यु झालेल्या दोन्ही लहानग्यांना डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे दिसून येत होती. मात्र, त्यांची डेंग्यूची टेस्ट निगेटीव्ह आली होती. त्या अनुषंगाने त्यांच्या वैद्यकीय अहवालाद्वारे इतर माहिती घेतली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.