Chikhali : महिलेचा विनयभंग करत नातेवाईकास मारहाण प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एकाच इमारतीत राहणाऱ्या तरुणाने महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला तसेच  महिलेला आणि महिलेच्या नातेवाईकास मारहाण केली. ही घटना 20 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास चिंचवडमधील कृष्णानगर येथे घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने 21 एप्रिल रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित महिलेच्या इमारतीत राहणार्‍या एका 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी तरुण हे एकाच इमारतीत राहतात. 20 एप्रिल रोजी रात्री साडे आठच्या सुमारास आरोपी इमारतीच्या जिन्यामधून त्याच्या घराकडे जात होता. त्यावेळी त्याने पीडित महिलेशी गैरवर्तन केले. याचा पीडित महिलेने तरुणाकडे जाब विचारला असता तरुणाने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. पीडित महिलेचे काका भांडण सोडविण्यासाठी आले असतात त्यांना देखील आरोपीने मारहाण केली. ‘उद्या तुमच्या घरातील सर्व सामान घराच्या बाहेर नाही काढले तर मी पण नावाचा घुले नाही. आता तुम्ही सोसायटीत कसे राहता हे पण मी बघतो’ अशी आरोपीने धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.