Pimpri : रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळण्याबाबत छगन भुजबळ यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा; गजानन बाबर यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळण्याबाबत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेली चर्चा सकारात्मक झाली असून भुजबळ यांच्याकडून वित्तविभागास विमा संरक्षण संबंधी शिफारस करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार व ऑल इंडिया शाॅपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी सांगितले.

रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळण्याबाबत झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शाॅपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष व माजी खासदार गजानन बाबर, समीर भुजबळ, जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाने, डोळसे पाटील, निवृत्ती कापसे आदि उपस्थित होते.

ऑल इंडिया शाॅपकिपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी यापूर्वी रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण मिळण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन रेशनिंग दुकानदारांची व्यथा मांडली होती व वेळोवेळी पाठपुरावा केला होता

दरम्यान त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून रेशनिंग दुकानदारांना विमा संरक्षण देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे व लवकरच याबाबत निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती गजानन बाबर यांनी दिली आहे.

रेशनिंग दुकानदारांनी केशरी कार्डधारकांना धान्य वाटप करताना विशेष खबरदारी घ्यावी तसेच ज्यांना गरज असेल त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा. कार्डधारकांच्या शेवटच्या पानावर शिक्का मारून त्या महिन्याचे धान्य मिळाले असे नमूद करावे. पंतप्रधान गरीब कल्याण योजना मार्फत फक्त अंत्योदय व प्राधान्यक्रम असलेले लाभार्थीनाच यांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सर्व रेशनिंग धारकांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण पुरवठा प्रधान सचिव संजय खंदारे यांच्या परिपत्रकानुसार नियमांचे पालन करावे अशी विनंती महाराष्ट्र राज्य रेशनिंग शॉपकिपर फेडरेशन च्या वतीने करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.