Chikhli : अग्निशामक केंद्राचे स्थळ दर्शवणारे फलक त्वरित लावा – दिनेश यादव

एमपीसी न्यूज – चिखली-कुदळवाडी परिसरात अलीकडेच उभारण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचे स्थळ नागरिकांना माहित व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, चिखली येथे अग्निशमन केंद्राचे काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आले आहे. चिखलीतील कुदळवाडी परिसरात वारवांर आगीच्या घटना घडत असतात. नवीन उभारण्यात आलेले अग्निशमन केंद्र मध्यवर्ती परिसरात आहे. त्यामुळे मध्यवर्ती परिसराबाहेर आगीच्या घटना घडल्यास अग्निशामक केंद्र नागरिकांच्या सहजपणे लक्षात येत नाही.

आग विझवण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच अग्निशामक वाहने किंवा खाजगी वाहनांना चिखली येथील अग्निशमन केंद्रामध्ये सहजपणे पोहचता यावे, याकरिता चिखली-कुदळवाडी परिसरात जागोजागी स्थळ व दिशादर्शक फलक त्वरित लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.