Dapodi : चिमुरडीवर अनैसर्गिक अत्याचार करून केला खून; आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – पाच वर्षीय मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दापोडी येथील सीएमई परिसरात आज (मंगळवारी) सकाळी घडला.

विजय बहाद्दूर यादव (वय 25, रा. देवरीया, जि. गाजियाबाद) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीची आई सीएमई दापोडी येथे स्वीपरचे काम करते. मागील सहा महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मुलीच्या आईने तिथेच काम कायम सुरु ठेवले. दरम्यान, आरोपी विजय हा मुलीच्या घरी वारंवार येत होता. तसेच तो मुलीच्या आईशी लग्न करण्याची मागणी देखील करत होता. मात्र, मुलीची आई वेळोवेळी ही मागणी धुडकावून लावत होती. आरोपी देखील सीएमईमध्येच वेटरचे काम करत होता.

मयत मुलीची मोठी बहीण, आई आणि ती अशा तिघीजणी राहत होत्या. सोमवारी रात्री आरोपी आणि मुलीच्या आईचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी आरोपीने ‘अद्दल घडवेन’ अशा प्रकारची धमकी दिली. सकाळी आई कामाला गेली. मोठी बहीण शाळेत गेली. त्यावेळी घरी ही चिमुकली एकटीच होती. आरोपी घरात आला. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आणि गायब झाला. मुलीची आई कामावरून घरी आली असता मुलगी बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली.

आईने तात्काळ मुलीला पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत भोसरी पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मुलीच्या आईने आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास केला असता आरोपी दापोडी येथील जंगलात असल्याचे समजले. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले. याचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

लहान बहिणीबाबत मोठ्या बहिणीला माहितीच नाही
मोठी बहीण आठ वर्षांची आहे. ती सकाळी शाळेत गेली. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. त्यानंतर आईने तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे मोठ्या बहिणीला या घटनेबाबत काहीही माहिती नव्हती. शाळा सुटल्यानंतर ती जेंव्हा घरी आली तेंव्हा तिची लहान बहीण कायमची निघून गेल्याचे समजताच तिने एकच आक्रोश केला. दरम्यान, मुलीच्या आईला देखील मोठा धक्का बसला असून तिलाही वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भोसरी पोलिसांकडे महिला कर्मचारीच नाहीत
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मनुष्यबळाची कमतरता आहे. त्याचा परिणाम पोलीस ठाण्यात देखील पाहायला मिळत आहे. भोसरी पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारीच नाहीत. तर महिला पोलीस कर्मचारी अगदी तोकडे आहेत. एखाद्या घटनेत महिला पोलिसांची आवश्यकता भासल्यास भोसरी पोलिसांना महिला पोलीस अधिकारी इतर पोलीस ठाण्यातून मागवून घ्यावे लागत आहेत. आज (मंगळवारी) घडलेल्या अत्याचार, खून आणि आत्महत्या प्रकरणात भोसरी पोलिसांना महिला पोलीस अधिका-यांची आणि कर्मचा-यांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवली. शेवटी भोसरी पोलिसांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून महिला पोलीस अधिकारी मागवले. ही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची मनुष्यबळाच्या कमतरतेची उणीव कधी भरून निघणार, याबाबत कोणीच निश्चित सांगण्यात तयार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.