Chinchwad : ताणतणावांमुळे माणसे हल्ली मोकळेपणाने हसायला विसरली – बंडा जोशी

एमपीसी न्यूज – “वाढत्या ताणतणावांमुळे माणसे हल्ली मोकळेपणाने हसायला विसरली आहेत; पण खळखळून हसणारा कोणताही माणूस खूप सुंदर दिसतो. भगवान ओशो म्हणत की, ‘जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करीत असतो; आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करीत असतो!” असे मत ज्येष्ठ कविवर्य बंडा जोशी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान आणि स्वातंत्र्यवीर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय सिध्दीविनायक वार्षिक व्याख्यानमालेत ‘हास्यमैफल’ या हास्य कवितांच्या कार्यक्रमाद्वारे कविवर्य बंडा जोशी, अनिल दीक्षित आणि भालचंद्र कोळपकर यांनी अंतिम पुष्प गुंफले.

यावेळी माजी नगरसेवक मधुकर बाबर, बांधकाम उद्योजक बजरंग गडदे, भास्कर रिकामे, कवी प्रदीप गांधलीकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ मस्के, उपाध्यक्ष अनिल गोडसे, संचालक संजय ढमढेरे उपस्थित होते. मधुकर बाबर यांनी शुभेच्छा दिल्या, तर भास्कर रिकामे यांनी पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या कार्याची माहिती दिली.

हास्यमैफलीत कवी अनिल दीक्षित यांनी, “मराठी माणूस मोडेन; पण कुणासमोर झुकणार नाही; आणि स्वतःची बायको सोडून कोणालाही घाबरणार नाही!” या सारख्या मार्मिक वाक्यांची आतषबाजी करीत विडंबन कविता सादर केल्या.

“मनाच्या धुंदीत, लहरीत येना” या प्रसिद्ध चित्रपटगीतावर “गुलाबी थंडीत, खिंडीत येना मुकाट खंडणी देना!” अशा विडंबनातून खंडणी मागणारा चोर; तसेच पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेच्या भावना -“पेट्रोल – डिझेल दरवाढीनं जीव माझा काढिला… हात कसा लावू आता माझ्या गाडीला!” या विडंबन लावणीतून मांडल्या. सध्या चर्चेत असलेल्या हेल्मेटसक्तीवर सादर केलेले, “हेल्मेटच्या सक्तीनं घाम काढिला गं बाई…डोकं आमच्या शासनाचं ठिकाणावर आहे की नाही!” या हास्यगीताला उपस्थितांची दाद मिळाली.

प्रत्येक राजकीय पक्षाच्या वर्मावर अचूक बोट ठेवून दीक्षित यांनी सादर केलेली काव्यमय पत्रे बिंग फोडणारी होती. प्रसारमाध्यमांतून महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या ‘नोटाबंदी’ या कवितेला रसिकांनी हशा आणि टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भालचंद्र कोळपकर यांनी महाविद्यालयीन जीवनातील प्रेमप्रकरणांचे किस्से विनोदी कवितांमधून गुंफले. लग्नासाठी बायको पाहण्याचा प्रयोग, नटीशी लग्न करण्याचा नाद आणि खेड्यातील अडाणी बायको तसेच भांडकुदळ बायको या विषयांवरील इरसाल कवितांनी रसिकांना खळखळून हसवले. “केवळ आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांनाच नव्हे तर देवाला देखील मनासारखी बायको मिळत नाही” या कोळपकर यांच्या निष्कर्षाला रसिकांनी पसंतीची दाद दिली.

कविवर्य बंडा जोशी यांनी “आता वाजले की बारा…” या चित्रपटगीताचे सुंदर विडंबन सुरेल आवाजात सादर केले. लोकप्रिय हिंदी चित्रपटगीतांची गुंफण करीत जोशी यांनी सादर केलेले किस्से रसिकांना खूप भावले. मोबाईलच्या अतिवापरावर…”याडं लागलं रं, याडं लागलं मोबाईलचं याडं लागलं…” या विडंबनातून त्यांनी माणसांच्या दैनंदिन जीवनात नकळत घडणारे विनोद चपखलपणे मांडले. राजकारण आणि चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांच्या स्वभाव आणि वृत्तीवर भाष्य करणारा पारंपरिक पाळणा सादर करून बंडा जोशी यांनी आपली सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विनोदबुद्धीचा प्रत्यय देत श्रोत्यांकडून मनमुराद हशे वसूल केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पायल सुरवसे या विद्यार्थिनीने आपल्या ओघवत्या वाणीतून शिवप्रतापाचे वर्णन केले. विनोद रामाणे, महेश पवार, राजू हरेल, अरविंद वाडकर, दत्तात्रय पटवेकर, राहुल वाडकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. संपत बोत्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.