Chinchwad Bye-Election: मतदारसंघाबाहेरून आलेल्यांनी सायंकाळी सहानंतर मतदार संघ सोडावा, निवडणूक विभागाच्या सूचना

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bye-Election) 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराचा कालावधी आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. मतदान बंद होण्याच्या 48 तास अगोदर सुरु असलेला प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर, मतदारसंघाबाहेरून आलेले आणि त्या मतदारसंघाचे मतदार नसलेले राजकीय नेते इत्यादींनी त्या मतदार संघात उपस्थित राहू नये. अशा नेत्यांनी प्रचाराचा कालावधी समाप्त होताच तो मतदार संघ सोडावा, अशा सूचना निवडणूक विभागाने दिल्या आहेत.

सायंकाळी 6 नंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या व्यक्ती, संघटना तसेच राजकीय पक्षांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिला आहे. मतदारसंघाचे मतदार नसले तरी सुद्धा उमेदवार किंवा त्याचा निवडणूक प्रतिनिधी यांना ही बाब लागू होणार नाही.

केवळ निवडणुकीच्या कालावधीत राज्याचा प्रभारी असलेल्या पदाधिका-यांच्या बाबतीत अशा निर्बंधाचा आग्रह धरला (Chinchwad Bye-Election) जात नाही. असा पदाधिकारी राज्य मुख्यालयातील आपले राहण्याचे ठिकाण घोषित करील आणि प्रस्तुत कालावधीतील त्याची ये-जा ही सामान्यपणे त्याचे पक्ष कार्यालय आणि त्याचे राहण्याचे ठिकाण यापुरतीच मर्यादित राहील.

उमेदवारास सायंकाळनंतर 48 तासाच्या कालावधीत कोणत्याही जाहीर सभा आणि मिरवणुका आयोजित करता येणार नाही. तसेच मतदान संपेपर्यंत प्रसारमाध्यमांना जनमत चाचणी प्रसारित करण्यास प्रतिबंध असेल. कोणत्याही जाहिराती किंवा प्रायोजित कार्यक्रम किंवा एखाद्या इराद्याने उमेदवाराला पाठिंबा देणारे किंवा टीका करणारे कोणतेही अहवाल निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारे किंवा प्रभावित करणारे कोणतेही अहवाल प्रतिबंधित असतील.

Chinchwad Bye-Election : 13 मतदान केंद्रे संवेदनशील

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या सूचनांप्रमाणे अपवादात्मक बाबी वगळता सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक विभाग कटिबद्ध आहे, असे ढोले यांनी सांगितले आहे. प्रचारासाठी लावण्यात आलेले फ्लेक्स, झेंडे, जाहिराती संबंधित उमेदवाराने काढून घ्यावे, तसेच कोणत्याही प्रकारे वाहनांद्वारे प्रचार करण्यास प्रतिबंध असेल, असेही ते म्हणाले. याबाबत पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना आचारसंहिता कक्षाला देण्यात आल्या आहेत.

मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे, आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश ढोले यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.