Chinchwad : मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चिंचवड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनविलेल्या टाॅप फरार गुन्हगारांच्या यादीत या गुन्हेगाराचा समावेश होता.

महेश उर्फ मच्या नंदू पाटोळे (वय  22, रा. मोरया हाउसिंग सोसायटी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोक्काच्या गुन्ह्यात मागील आठ महिन्यांपासून फरार असलेला आरोपी महेश याच्यावर चिंचवड पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस लक्ष ठेवून होते. मात्र तो पोलिसांच्या जाळ्यात अडकत नव्हता. रविवारी (दि. 12) चिंचवड तपास पथकाचे पोलीस शिपाई अमोल माने यांना माहिती मिळाली की, आरोपी महेश हा पुण्यातील दत्तवाडी येथे म्हसोबा चौकात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून महेश याला अटक केली.

पिंपरी -चिंचवड पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पंचवीस फरार गुन्हेगारांची यादी बनविली आहे. या यादीमध्ये आरोपी महेश याचादेखील समावेश आहे. आरोपी महेश मागील आठ महिन्यांपासून फरारी होता.  सर्वच पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेचे पोलिसही त्याच्या मागावर होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलिस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, स्वप्निल शेलार, ऋषिकेश पाटील, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, अमोल माने यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.