Chinchwad crime News : स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – लिंक रोड, चिंचवड येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन एक महिला रस्त्याने पायी निघाली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

पल्लवी नितीन भालेराव (वय 46, रा. चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव लिंक रोड, चिंचवड येथील स्वामी समर्थ मंदिरात रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेऊन त्या घराकडे निघाल्या. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे आले. त्यांनी भालेराव यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.