Chinchwad crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 31 डिसेंबरला 80 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – 31 डिसेंबर रोजी मद्य प्राशन करून वाहन चालवणा-यांवर पोलिसांकडून 80 तळीरामांवर कारवाई करण्यात आली, तर 55 प्रतिबंधात्मक आणि तीन हजार 340 जणांवर चलन कारवाई करण्यात आली आहे.

मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघाताची दाट शक्यता असते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालाविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे आढळल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाई केली जाते.

काही वाहन चालक मद्य प्राशन करून वाहन चालवत असतानाही पोलिसांसोबत हुज्जत घालून आपण मद्य प्राशन केले नसल्याचे रेटून सांगतात. अशा वाहन चालकांवर वचक बसण्यासाठी तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत कारवाई केली.

मद्य प्राशन करून वाहन चालवत असल्याचा पोलिसांना संशय आल्यास संबंधित वाहन चालकाची रक्ताची चाचणी करून त्यात अल्कोहोलचे प्रमाण तपासण्यात आले. रक्ताच्या तपासणीत अल्कोहोलचे प्रमाण आढळणा-यांवर पोलिसांनी थेट कारवाई केली आहे.

31 डिसेंबर निमित्त केलेल्या या कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आठ रुग्णवाहिका ठिकठिकाणी तैनात केल्या होत्या.

निगडी पोलिसांनी 19, आळंदी 7, वाकड 3, चिखली 1 अशा 30 कारवाया पोलिसांनी तर 50 कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 80 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली.

तसेच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी 5, भोसरी 3, आळंदी, दिघी प्रत्येकी एक, हिंजवडी 39, देहूरोड, शिरगाव आणि म्हाळुंगे पोलिसांनी प्रत्येकी दोन अशा 55 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या.

वाहतूक पोलिसांनी चलन कारवाया मोठ्या प्रमाणात केल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी तीन हजार 292 जणांवर वाहतूक पोलिसांनी चलन कारवाई केली. त्यात 12 लाख 78 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर एमआयडीसी भोसरी 2, भोसरी 9, चिंचवड 3, वाकड 4, हिंजवडी 6, चिखली 4, रावेत 20 अशा 48 कारवाया पोलीस ठाणे स्तरावर करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.