Chinchwad : मोठी कामगिरी केली, पण ती जगासमोर येण्यापूर्वीच नियतीने घात केला

दरोडा विरोधी पथकातील पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार राजेश कौशल्य यांचे निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या (Chinchwad) हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान सोमवारी (दि. 14) त्यांची प्राणज्योत मालवली. घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केल्यानंतर रात्री उशिरा ते घरी जात होते. त्यांची कामगिरी जगासमोर येण्यापुर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

राजेश कौशल्य हे सन 2009 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केले. सन 2018 साली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीला ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत उत्तम प्रकारे काम केले.

ते 2 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या दुचाकीवरून जात होते. मोशी येथे त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र, अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

रात्री दीड वाजताची वेळ होती. रस्त्याने येणारे जाणारे कुणीही नव्हते. त्यामुळे सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आला.

त्या चालकाने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले.

राजेश यांच्या अपघाताची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. दरोडा विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची (Chinchwad) प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

मोठी कामगिरी केली फत्ते पण…

घरफोडीच्या गुन्ह्यात राजेश यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या या कामगिरीबाबत वरिष्ठ देखील अतिशय खुश होते. 2 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत दरोडा विरोधी पथकाच्या कार्यालयात याबाबत कायदेशीर कामकाज झाले.

तिथून दीड वाजताच्या सुमारास राजेश हे त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. त्याच वेळी स्पाईन रोडवर ही घटना घडली. राजेश यांनी केलेली कामगिरी जगासमोर येण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अवयव दान

समाज सेवेची जाण असलेल्या राजेश यांनी त्यांचे अवयव दान करण्याचा अर्ज भरला होता. रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी (दि. 13) सायंकाळी त्यांना मेंदुमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी देखील अवयव दानासाठी संमती दिली. सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली असता त्यांचे अवयव दान करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.